लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीम : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. त्यामुळे आता संभाव्य विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेऊन तयारीला लागण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला जात आहे.

मात्र, वाशीम जिल्हयातील भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस कमालीची वाढली आहे. पक्षात निष्ठावंताना कुठलेच स्थान उरले नसून आयाराम, गयारामांना पद, प्रतिष्ठा दिली जात आहे. अनेकांची पक्षात मक्तेदारी वाढली आहे. जिल्हाध्यक्ष पक्षाची ध्येय धोरणे सोडून एका कुटुंबाची चाकरी करीत आहेत. तर रिसोड मालेगाव विधानसभेत आयाराम गयारामांना उमेदवारी दिल्यास थेट भाजपविरोधात काम करु, असा ईशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात केल्याने भाजपमधील अंतर्गत खदखद उफाळून येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

आणखी वाचा-वर्धा : सहा पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या काय आहे कारण…

समाजमध्यमावर एक पत्र सध्या चांगलेच प्रसारित होत असून त्यामधून वाशीम भाजपमधील खदखद व्यक्त करण्यात आली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहून पक्षाला वाचविण्याचे भावनिक आवाहन केले आहे. या पत्रावर नमुद केले आहे की, वाशीम जिल्हयात भाजपची वाताहत होत आहे. काही दिवंगत नेत्यांनी आपला गैरसमज केला. अनेक अनुभवी व कर्तुत्ववान कार्यकर्ते बाजूला सारुन आयाराम गयारामांना पद आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. रिसोडच्या नेतृत्वाला व त्याच्या अकार्यक्षम पोराला पक्षात घेतले. व रिसोड मालेगावची धुरा त्यांच्याकडे दिली. मात्र अल्पावधीतच पक्षाचे कार्यालय बदलून दादांचा बंगलाच पक्षाचे कार्यालय बनल. दादाला मानणारा कार्यकर्ताच पक्षाचा कार्यकर्ता हे नवे सुत्र तयार झाले. मतदार संघातील जुने व अनुभवी तरुण कार्यकर्ते अक्षरश: मनमानी करुन बाजुला सारले.

कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र

परिणामी ज्या रिसोड मालेगाव मध्ये २०१४,२०१९ मध्ये अकोला लोकसभेत प्रचंड लीड घेतली. ती लीड २०२४ च्या निवडणुकीत ४ पट घटली. रिसोडच्या स्वयंभु दिग्गज नेत्यांचा राजकुमार या जन्मात तरी आमदार आम्ही पार्टीचे कार्यकर्ते होऊ देणार नाही. हे मात्र नक्की. एका कुटुंबाला १४ वर्षे पक्ष संघटनेची धुरा दिली. मात्र त्यांनी भाजपा म्हणजे आपल्या घरची जहांगीरी समजून पक्षात आपल्या आमदारकीला फायदा होईल अशाच नियुक्त्या दिल्या. चांगले कार्यकर्ते संपविण्याचा प्रयत्न झाला. स्वताच्या पोरासाठी तरुण कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत न घेण्याचे फर्मानच त्यांनी काढले होते.

आणखी वाचा-यवतमाळ : कोलकत्ताच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ने घाटंजीत थाटला दवाखाना, अडकला अन् सुटलासुद्धा…

त्यात ते यशस्वीही झाले. लोकसभा निवडणुकीत तर जिल्हयाची धुरा उमेदवारांच्या पतीने पोराच्या घरी जावून पोरगा व ज्याचा पक्ष संघटनेशी कुठलाही संबध नसलेल्या पोराच्या काकाकडे दिली. त्याला त्याचा इतका माज आला की, एका जाहिर सभेच्या स्टेजवर वरिष्ठ नेत्याशी वाद घातला. प्रोटोकॉलच्या बाहेर जावून भाषणे करु लागला. आता निवडणुकीचे परीणाम देवेंद्रजी आपल्या समोर आहेत. अशा शब्दात थेट देवेंद्र फडणवीस यांनाच कैफियत मांडून निष्ठावान कार्यकर्त्यांची होणारी अवहेलना थांबवा, अन्यथा पक्षाचे पाणीपत व्हायला वेळ लागणार नसल्याची खदखद व्यक्त केली आहे.

जिल्हाध्यक्ष पक्षाचे की एका कुटुंबाचे ?

भाजपमध्ये उत्तम संघटन कौशल्य असलेले कार्यकर्ते असतांना अकार्यक्षम जिल्हाध्यक्ष कार्यकर्त्यांच्या माथी लादला गेला. दिलेला जिल्हाध्यक्ष पक्ष संघटन वाऱ्यावर सोडून फक्त एका कुटुंबाची चाकरी करतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्ष कुणाच्या दावणीला बांधला होता. बुथ किट सुध्दा कार्यकर्त्यांपर्यत जिल्हाध्यक्ष पोहचू शकले नाहीत. परिणाम आपल्या समोर आहेतच. पक्षाने नेमलेले सरचिटणीस नोकरी वा कामानिमित्त वाशीम जिल्हयात आलेले आहेत. जिल्हयातील मुळ रहीवासी नाहीत. यातील एक सरचिटणीस तर घोटाळे करुन आलेला असून निवडणुकीचे पैसे लाटून पसार झाला असल्याचा आरोपही या पत्रात केला आहे.

आणखी वाचा-अमरावती : आमदार बच्‍चू कडू यांच्‍या जीवाला धोका, जिल्‍हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र…

…तर स्वबळावर सत्ता!

वाशीम जिल्हयात पक्षाची झालेली वाताहत आम्ही अनुभवतोय आणि त्याचा परिणाम निवडणुकीत जाणवतोय. देवेंद्रजी आता विधानसभा येत आहे. पक्षाबददलची तुमची तळमळ जाणवत आहे. परंतु जिल्हयातील ही कोगीर भरती काही दिवस बाजुला ठेवून तुम्ही स्वत: लक्ष घालून चांगले कार्यक्षम कार्यकर्ते संघटनेत मोठे करा.मग पहा २१४ पेक्षा ही आणखी ताकतीने स्वबळावर सत्तेत येवू, देवेंद्रजी हे उपऱ्याचे काम नव्हे, येथे पाहीजे निष्ठावंत. अशी मागणी या पत्रात केलेली आहे. त्यामुळे आता याकडे वरिष्ठ स्तरावरुन काय कार्यवाही होणार की, भाजपमधील खदखद उफाळून येणार हे लवकरच स्पष्ठ होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activist wrote letter to devendra fadnavis and ask him to stop monopoly in bjp pbk 85 mrj