बुलढाणा : आमदार राजेंद्र शिंगणेंच्या ‘यू टर्न’ मुळे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. दरम्यान घाटाखालील प्रमुख नेते प्रसेनजीत पाटील यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
आमदार शिंगणे हे मुंबईस्थित ‘सिल्वर ओक’ व यशवंतराव चव्हाण केंद्रावर दिसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्ते निर्धास्त होते. जिल्ह्यात शिंगणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी स्थिती असल्याने ते एकदम स्वस्थ असल्याचे चित्र होते. मात्र आज त्यांनी अजितदादांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतल्याने हे चित्र बदलले. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी चव्हाण केंद्रावरील बैठकीला हजर होते. त्यांनी ‘आम्हीं शरद पवार साहेबांसोबत’ अशी ग्वाही दिली. मात्र आज शिंगणेंच्या निर्णयाने ते थक्क झाले! यामुळे कुणीही एकदी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी देखील स्पष्ट काही सांगायला तयार नाही.
या राजकीय धामधुमीत घाटाखालील प्रभावी नेते तथा प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांनी आपण शरद पवार यांच्यासमवेतच असल्याचे जाहीर केले आहे. जळगाव जामोद बाजार समितीचे सभापती असलेले पाटील यांनी २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय कुटे यांना चुरशीची झुंज दिली होती. मात्र एकदा अडीच हजार तर दुसऱ्यांदा चार हजाराच्या फरकाने ते पराभूत झाले. उर्वरित नेत्यांपैकी किती जण शरद पवार यांच्या सोबत राहतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.