अकोला : करोना महामारीच्या संकटात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईने दुसरे लग्न करून स्वतंत्र संसार थाटला. अल्पवयीन मुलीची जबाबदारी आली ती वयोवृद्ध आजीवर. घरची परिस्थिती हालाखीची. सांभाळ कसा करावा या विवंचनेत असलेल्या आजीच्या डोक्यात विचार आला आणि त्यांनी नातीच्या लग्नाचा घाट घातला. घडले मात्र वेगळेच.
अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात होऊ घातलेला बालविवाह वेळीच रोखण्यात ‘ॲक्सेस टु जस्टिस’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले.चान्नी लगतच्या गावात बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. ‘ॲक्सेस टु जस्टिस’ प्रकल्प, आयएसडब्ल्यूएस पथकाने तत्काळ बालिकेच्या घरी भेट दिली. मुलीचे वडील चार वर्षांपूर्वी मरण पावले असून आईने दुसरे लग्न केल्याने पालनपोषण आजी करत होती. आजीने तशी माहिती पथकाला दिली. घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने तसेच दुसऱ्या कुणाचा आधार नसल्याने मुलीचे लग्न करण्याचा विचार केला होता, असे आजींनी पथकाला सांगितले. त्यावेळी पथकाच्या सदस्यांनी आजींची समजूत काढली व बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. मुलीचे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न करता येत नाही, असे सांगितले. मुलीला बालकल्याण समिती समक्ष सादर करण्यात आले. बालकल्याण समितीने मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न न करण्याबाबतचे हमीपत्र लिहून घेतले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस यांची साक्ष घेण्यात आली. हा बालविवाह थांबविण्यासाठी बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले, संस्थेचे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये, विशाल गजभिये, कम्युनिटी सोशल वर्कर पूजा पवार, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील यांनी मोलाचे कार्य केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बालविवाहाची गंभीर समस्या
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये, असे कायदा सांगतो. शरीराची पुरेशी वाढ न झालेल्या बालविवाहातील मुलींवर लगेच बाळंतपण लादले जाते. त्यात होणारा रक्तस्राव, माता मृत्यूचे वाढते प्रमाण, त्यामुळे कायमस्वरूपी ऍनिमिक होणे आणि जन्माला येणारी मुले कमी वजनाची कुपोषित असणे त्यातून बालमृत्यूचे प्रमाण वाढणे असे अनेकविध आरोग्यविषयक दुष्परिणाम आहेत.