वर्धा: प्रश्नांकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असेल तर समस्या विविध मार्गे वेशीवर टांगण्याचे काम आंदोलक करीत असतात. आर्वी येथे पण असेच झाले. लहान दुकानदारांना पूर्वसूचना न देता त्यांची दुकाने बुलडोझर चालवून नेस्तनाबूत करण्यात आली.
आर्वी पालिकेने केलेल्या या कारवाईत अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याचा आरोप करीत प्रहार सोशल फोरमने स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. मात्र चर्चा फोल ठरल्यावर संघटना प्रमुख बाळा जगताप यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते स्मशानभूमीकडे धावले.
हेही वाचा… चिंता वाढली! पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; गोंदिया जिल्ह्यात आत्तापर्यंत १२०० हेक्टरवर नुकसान
आता आम्हीच आमचे बरे वाईट करून घेतो, असा त्रागा केला. त्याची पटकन दखल पालिका अधिकाऱ्यांनी घेतली. ते घटनास्थळी पोहचले, म्हणाले की तहसील कार्यालय व न्यायालयीन इमारत काहीच दिवसात नव्या जागेत जात आहेत. ती जागा बेरोजगार तसेच व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाईल. पालिकेच्या रिकाम्या जागा पण देऊ. हा प्रस्ताव दोनच दिवसात राज्य शासनास देणार, अशी हमी मिळाली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र तोडगा अमलात न आल्यास मोठे आंदोलन शहरात उभे राहील, असे बाळा जगताप यांनी स्पष्ट केले.