लोकसत्‍ता टीम

अमरावती: प्रसिद्ध हास्‍य अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे (८३) यांचे येथे गुरूवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्‍यांचे मरणोत्‍तर नेत्रदान करण्‍यात आले. सायंकाळी त्‍यांच्‍या पार्थिवावर रहाटगाव येथील स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहेत.

भारत गणेशपुरे यांचे बंधू मनीष यांच्‍या रहाटगाव येथील राहत्या घरी मनोरमाबाई यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आईच्‍या निधनाचे वृत्‍त कळताच भारत गणेशपुरे हे मुंबई‍हून अमरावतीकडे निघाले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या दूरचित्रवाहिनी मालिकेच्‍या माध्यमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते भारत गणेशपुरे हे मूळचे अमरावती जिल्‍ह्याचे आहेत. मनोरमाबाई यांचे नेत्रदान करण्‍यास दिशा ग्रूपचे सचिव स्‍वप्निल गावंडे आणि मुंबई येथील दिग्‍दर्शक विराग वानखडे यांनी प्रेरित केले.

आणखी वाचा- वर्धा : बालिकेवर अत्याचार; फरार मजुरास अखेर गडचिरोलीतून अटक

bharat ganeshpure mother death

गणेशपुरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उदात्‍त हेतूने गणेशपुरे कुटुंबीयांनी नेत्रदानास संमती दिल्‍यानंतर दिशा इंटरनॅशल आय बँकेच्‍या चमूने मनीष गणेशपुरे यांच्‍या निवासस्‍थानी पोहचून नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी दिशा ग्रूपचे सचिव स्‍वप्निल गावंडे, डॉ. मनीष तोटे, हिमांशू बंड, अंकुश आंबेडकर आदी उपस्थित होते. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्‍याबद्दल दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्‍या अध्‍यक्ष कुंदा अरूण गावंडे, स्‍वप्निल गावंडे यांनी गणेशपुरे कुटुंबीयांचे आभार मानले.

Story img Loader