लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : ‘सध्यातरी आता मी पडद्यावर येणार नाही. कारण सध्या माझ्याकडे तसं काही काम नाहीये. मला कोणी अभिनेता म्हणून घेतही नाहीये असे वक्तव्य मी गमतीने केले होते असे मराठी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सचिन पिळगांवकर याने आज येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

‘स्थळ’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सचिन चंद्रपुरात आला असता स्थानिक एफईएस गर्ल्स विद्यालयात पत्रकारांशी संवाद साधतांना अनेक विषयांवर व्यक्त झाला. माझ्याकडे काम नाही हे मी गमतीने बोललो होतो, मात्र दिग्दर्शक असल्यामुळे एक अभिनेता म्हणून मला चित्रपटात कुणी घेत नाही ही वस्तुस्थिती आहे असेही सचिन म्हणाला.

केवळ मीच नाही तर आघाडीची अभिनेत्री जया बच्चन ही अभिताभ बच्चन यांची पत्नी आहे म्हणून त्यांना देखील अशाच पध्दतीने चित्रपटात घेतले जात नाही असेही सचिन म्हणाला. मी कलावंत आहे, अभिनेता, दिग्दर्शक आहे, तेव्हा मी माझे चित्रपट करणार ही वस्तुस्थिती असली तरी अभिनेता म्हणून इतरांनीही संधी द्यायला हवी, मात्र मी त्यांच्या चित्रपटात काम करणार नाही अशा समजातून ते चित्रपटात घेतच नाही असेही तो म्हणाला. हे सर्व स्वयंम् घोषित आहे, त्यांच त्यांनी ठरवून टाकले आहे की मी हे करणार नाही, मी अभिनय सोडलेला नाही हे सांगायचे होते, त्यामुळेच मी यावर प्रकाश टाकण्यासाठी हा कटाक्ष टाकला होता असेही सचिन म्हणाला.

मी अभिनय सोडला आहे, असं कदाचित त्यांना वाटत असेल. पण तसं नाहीये. ती चुकीची समजूत आहे.’ असंही सचिन म्हणाला. अमेरिका तसेच मामी चित्रपट महोत्सवात स्थळ हा अतिशय वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाने लक्ष वेधून घेतले, हा चित्रपट मला खूप आवडला, त्यामुळेच या चित्रपटशी जुडण्याचा निर्णय घेतला व आज मी स्थळ चित्रपट प्रेझेंट करित आहो असेही सचिन म्हणाला.

स्थळ चित्रपट आवडला , त्यामुळे हा चित्रपट प्रमोट करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. केवळ चित्रपटच नाही तर या चित्रपटाचे टायटल आवडले. या नावाचा सिनेमा यापूर्वी कधीच बनलेला नाही, तसेच अशा विषयावर देखील आजपर्यंत कुणी चित्रपट बनविला नाही. आपण चित्रपटात मुलीचे लग्न हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो, मात्र या चित्रपटात अतिशय वेगळ्या पद्धतीने मुलींच्या लग्नाच्या विषयाला हात लावण्यात आलेला आहे.

या चित्रपटातील सर्वच कलावंत चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत, काही कलावंत वरोरा तालुक्यातील डोंगरगांव येथील आहे. डोंगरगांव, आनंदवन, वरोरा व वणी या ठिकाणी अवघ्या बावीस दिवसात हा चित्रपट चित्रीत झालेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक व डोंगरगांव येथील मूळ रहिवासी जयंत सोमलकर यांच्या बालपणीच्या आयुष्यातील एका प्रसंग, अनुभवावर या चित्रपटाची कथा आहे.

गावखेड्यात मुलीला पाहण्याचा कार्यक्रम आणि त्यानंतरच्या घटनाक्रमावर ही कथा आहे. हा संपूर्ण प्रसंगी व अनुभव तसेच आयुष्यातील घटना घडली, त्या घटनेनंतर काही लेखक दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना लिहावे वाटले, त्यांना हा विषय लिहिण्यास अनेकांनी प्रोत्साहित केले. हा विषय कथेतून मांडल्यानंतर त्यावर सिनेमा करू शकतो असेही त्यांना अनेकांनी सूचविले व त्यातूनच हा चित्रपट तयार झाला आहे असेही सचिन यांनी सांगितले. चांगला सिनेमा घडतो, घडवत नाही, घडला तर तुमच्या कडे सुपर पॉवर आहे. तुमच्याकडून कुणीतरी हे सर्व घडून घेतो असेही सचिन म्हणाला.

‘स्थळ’चे नशीब फार चांगले आहे. या चित्रपटाला कथा सापडली, दिग्दर्शक मिळाला, गावात चित्रीकरण होताना गावकऱ्यांना वाटले ही हा चित्रपट व्हायला हवा त्यांनीही संपूर्ण मदत केली. या चित्रपटातील एकाही कलावंताने यापूर्वी कॅमेरा फेस केला नव्हता. अशी सर्व नविन ग्रामीण भागातील कलावंत या चित्रपटात आहेत असे जयंत सोमलकर यांनी सांगितले.विशेष म्हणजे या सर्व नवख्या कलावंतांनी इतके सुरेख काम कलावंतांनी केले आहे त्यामुळे चित्रपट एका वेगळ्या उंचीवर गेला आहे. अतिशय वास्तवदर्शी सिनेमा व्हावा म्हणूनच स्थानिक कलावंतांची निवड केल्याचे जयंत यांनी सांगितले. स्थळ हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होत असून यावेळी सिनेमाचे सर्व कलावंत, निर्माते, वितरक उपस्थित होते. पायरसी आज प्रत्येक सिनेमाची होते. ती होऊ नये यासाठी वेगळी यंत्रणा आहे. मात्र त्यावर नियमित लक्ष ठेवावे लागते. ही यंत्रणा खर्चिक आहे असेही सचिन म्हणाला.