वर्धा : हिंदू कोणावर आक्रमण करीत नाही. पण इथे हिंदू बहुसंख्य असल्याने निधर्मवाद उफाळला आहे, असे प्रतिपादन अभिनेते व वक्ते शरद पोक्षे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या साडे तीनशेव्या सुवर्ण महोत्सवीदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्धा शाखेतर्फे हिंदू साम्राज्य दिनाचे आयोजन सरोज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पोक्षे यांनी भूमिका मांडली.
पोक्षे म्हणाले की, ज्या दिवशी या हिंदुस्थानात हिंदू ४९ टक्के होईल त्या दिवशी निधर्मवाद संपलेला असेल. बजरंग दलावर बंदी आणण्याचे आश्वासन देवून काँग्रेस कर्नाटकात सत्तेवर येते. एक महिना होत नाही तोच डॉ. हेडगेवार व सावरकरांचा धडा शिक्षणातून काढून टाकल्या जातो. हे चित्र मिटवायचे असेल तर राजा हिंदुत्ववादी असणे ही पुढील काळाची गरज आहे. महाराष्ट्रासह हिंदुस्थानात हिंदू शब्दावरून गदारोळ सुरू आहे. दुसरीकडे औरंगजेब, टिपू सुलतान यांची जयंती साजरी केल्या जात आहे. आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो तर पाप केले काय, असा सवाल पोक्षे यांनी केला.
हेही वाचा – नागपूर : कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाविरुद्ध मुंडन, जय विदर्भ पार्टी आक्रमक
हिंदुस्थानात हिंदू सतत घाबरलेला का आहे, असेही ते म्हणाले. आम्हाला धर्म हा शब्द कुठून आला, धर्म कशाला म्हणतात, धर्म कुठून सुरू झाला हे समजून घेण्याची गरज आहे. धर्म म्हणजे रीलिजन नाही. धर्मात व्यापकता आहे. हे सर्व बदलण्याची संधी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा चालून आली होती. आम्हाला हिंदुस्थान नावाचं स्वतःचं हक्काचं घर मिळालं होतं. मात्र तेव्हाच्या पंतप्रधानांना हे काही करण्याची गरज वाटली नाही. कारण ते त्याचे वंशज होते. त्यांना आधीचेच घर ठेवण्यात धन्यता वाटली. आम्हाला आमच्या घराचा अभिमान नाही. घराला आग लागत नाही तोपर्यंत हिंदू जागा होत नाही. निधर्मी कुणीच नाही. प्रत्येकास गुणधर्म असतो. गुणधर्माचे पालन करणे म्हणजे धर्म होय. माणूसकी हाच हिंदूचा जन्मजात गुणधर्म होय. ज्या धर्माला संस्थापक नाही, नियमावली नाही, जो निसर्गाने स्थापन केला तो असा जगातला एकमेव धर्म हिंदू धर्म होय. तो कधीच संपणार नाही. म्हणून हिंदू संपला नाही. जो अधर्माने वागतो तो संपला पाहिजे. म्हणून आपण रावणाला जाळतो. अधर्म संपविणे हे आपल्या धर्माने शिकविले आहे. ब्रिटिशांनी हिंदूंना हिंदुस्थानापासून दूर नेले. आम्ही इंग्रजी भाषेसमोर नतमस्तक होतो कारण नव्वद टक्के हिंदू अज्ञानी आहे. हे हिंदू राष्ट्र व्हावे, असे वाटत असेल तर हे घर हिंदूंचं आहे हे मान्य करावे लागेल, अशी स्पष्टोक्ती पोक्षे यांनी केली.
हेही वाचा – नागपूर : पाचवीत प्रवेश हवा.. नऊ हजार रुपये मोजा.. ‘एसीबी’ची कारवाई कुणावर?
जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत व नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रेक्षकात उपस्थित खासदार रामदास तडस यांची पोक्षे यांनी आपल्या भाषणातून आवर्जून नोंद घेतली.