नागपूर : ‘सीआयडी‘ नाव उच्चारले तरी धडकी भरते. हेच सीआयडी उपराजधानीतल्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात अचानक पोहोचले, तेव्हा क्षणभर सारेच अवाक् झाले. हे सीआयडी म्हणजे दुसरेतिसरे कुणी नाही तर ‘सीआयडी’ या गाजलेल्या मालिकेतील अभिनेते शिवाजी साटम. मालिकेत गुन्हेगारांना शोधून शिक्षा भोगायला लावणारा हा सीआयडी वन्यजिवांच्या छोट्या अनाथ पिलांना बघून भाऊक झाला आणि त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, अभिनेत्री मधुरा वेलणकर, अभिजित साटम यांनी नुकतीच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात जंगल सफारी केली. खरे तर ही सफारी आटपून ते परस्पर मुंबईच्या दिशेने रवाना झाले असते. मात्र, भारतातील पहिल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राला भेटण्यासाठी ते मुद्दाम नागपुरात आले. पुण्यातील वन्यजीवप्रेमी अनुज खरे त्यांच्यासोबत होते. त्यांच्याकडून साटम यांनी या केंद्राबद्दल बरेच ऐकले आणि आवर्जून परतीच्या प्रवासात त्यांनी या केंद्राला भेट दिली. या केंद्रात उपचारासाठी आलेल्या व आईपासून विभक्त झालेल्या वन्यजिवांच्या छोट्याश्या पिलांना बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. वन्यजिवांवरील उपचार आणि उपचारानंतर बरे झालेल्या वन्यजिवांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता ही पद्धत जाणून घेताना ते भावूक झाले होते.
शिवाजी साटम हे दिग्गज कलावंत आहेत, तर मधूरा साटमदेखील त्याच ताकदीच्या कलावंत. मात्र, या केंद्रात आल्यानंतर आपण खूप मोठे ‘सेलिब्रिटी’ असल्याचे कुठेही त्यांच्या वागण्यातून झळकत नव्हते. केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यप्राण्यांची काळजी घेणारे मदतनिस यांच्याशीदेखील सहज संवाद साधला आणि पुन्हा भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.