रेड स्वस्तिक संस्थेचे प्रमुख तुकाराम भाल यांची खंत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
समाजातील वंचित, उपेक्षित आणि गोरगरिबांसाठी शासकीय पातळीवर अनेक योजना राबवल्या जातात हे खरे आहे, परंतु यासोबतच समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून या कामी सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांही खूप महत्त्वाच्या आहेत. देशभरात अशा अनेक संस्था आहेत. त्यांना आर्थिक मदत करणारे दानदातेही खूप आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी पैसा हाच घटक महत्त्वाचा नाही. या संस्थांना प्रत्यक्ष राबणारे हातही हवे आहेत. मात्र, दुर्दैवाने असे हात कमी होत आहेत, अशी खंत रेड स्वस्तिक या संस्थेचे प्रमुख आणि माजी पोलीस अधिकारी तुकाराम भाल यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. मांगल्याचे प्रतीक म्हणून स्वस्तिक चिन्हाकडे बघितले जाते. भारतीय संस्कृतीचे नाव विश्वस्तरावर नेता येईल, या दृष्टीने रेड स्वस्तिक या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यासह शैक्षणिक आणि वयोवृद्धांसाठी काम केले जाते. आमच्या संस्थेने २००१ मध्ये काम सुरू केले. पोलीस विभागात अधिकारी असताना काही वेळ सामाजिक सेवेसाठी देत होतो. त्या माध्यमातून विविध क्षेत्रातील माणसे जोडली आणि संस्थेचा व्याप वाढला. राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात संस्थेच्या ६१ शाखा आहेत. संस्थेचे आठ हजार सदस्य असून त्यात सफाई कामगारांपासून उद्योगपतींचा समावेश आहे. हे सर्व एकत्रित काम करीत असतात. आम्ही स्वत:साठी कधी दानदात्यांकडून पैसा मागत नाही. सामाजिक काम हे आमचे उदरनिर्वाहाचे साधन नाही.
उदासामध्ये एक आदिवासीची शाळा आहे. संस्थेतर्फे कॉलेजचा एक ग्रुप नागपुरात तयार केला आणि त्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. तेथील मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देत असतो. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आम्ही त्या ठिकाणी जात असतो. येथे एकूण ४७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
देवलापारच्या मुलीला जीवनदान दिले
देवलापारजवळील आश्रमशाळेतील एका मुलीचा अपघात झाला. त्यात तिचा एक डोळा निकामी झाला. शिवाय पाय आणि हातही फ्रॅक्चर झाले. या मुलींची माहिती मिळताच नागपूरला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तिच्यात काही सुधारणा होत नसल्याचे लक्षात येताच तिला मुंबईला नेण्यात आले आणि संस्थेच्यावतीने तिचा सर्व वैद्यकीय खर्च करून तिला जीवनदान दिले. सध्या ती मुलगी देवलापारमधील एका शाळेत इयत्ता दहावीला असून नुकताच तिचा सत्कार करण्यात आला, अशी माहितीही तुकाराम भाल यांनी दिली.
१०० खाटांच्या वृद्धाश्रमाची निर्मिती
कल्याणजवळ चौरे नावाचे गाव असून त्या ठिकाणी एका दानदात्याने साडेचार एकर जमीन संस्थेला दिली. त्या जागेवर १०० खाटा असलेल्या वृद्धाश्रमाची निर्मिती केली आहे. शहरी भागातील अनेक वयोवृद्ध एकाकी जीवन जगत असतात. ते या ठिकाणी राहतात. स्वामी विवेकानंदांच्या विचारावर चालणारी ही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासोबत समाजातील उपेक्षितांचे अश्रू पुसण्याचे काम करीत आहे.
वैद्यकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
नागपुरात पंचशील चित्रपटगृहाजवळ संस्थेचे कार्यालय आहे. मुख्य शाखा मुंबईला असून विदर्भात अमरावती, अकोला, नागपूर शहरात काम सुरू आहे. केवळ शाखा वाढवणे हा आमचा उद्देश नाही. समाजात काम करण्यावर अधिक लक्ष देत असतो. वैद्यकीय आणि सामाजिक सेवेत काम करणाऱ्यांना संस्थेच्यावतीने सुश्रूत, चरक, नकुल आणि भाई कन्हय्या असे पुरस्कार दिले जातात.