नागपूर : भाजप प्रणित नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धोरण ठरवते आणि त्यांची अंमलबजावणी मोदी सरकार करते, असे वाटत होते. परंतु आता वेगळेच चित्र समोर आले आहे. उद्योजक गौतम अदानी धोरण ठरवतात, मोदी त्याची अंमलबजावणी करतात आणि संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत त्याला प्रमाणित करतात, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली.
पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जातात ते अदानी यांचे एजन्ट बनून. हे देशाची मान शरमेने खाली घालवणारी बाब आहे. देशात एवढे उद्योजक आहेत, पण मोदी फक्त अदानीला मदत करतात. मोदी आधी अदानीच्या विमानाने फिरत होते. अदानी त्यांना गुजरातमध्ये मदत करीत होते. आता त्याची परतफेड म्हणून मोदी त्यांना परदेश दौऱ्यावर घेऊन जातात. सगळ्या क्षेत्रात अदानीसाठी नियमांची मोडतोड केली जाते आहे. एलआयसी आणि बँकेतून कोट्यवधी रुपये त्यांना व्यवसाय करण्यासाठी दिले गेले. अशाप्रकारे जनतेचा पैसा आणि देशाची संपत्ती लुटणारा अदानी देशभक्त कसा? असा सवाल मोहन प्रकाश यांनी संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत यांना विचारला.