लोकसत्ता टीम

बुलढाणा: नाचत जावू त्याच्या गावा रे खेळीया! सुख देई, विसावा रे!! मलकापूर मार्गे विदर्भात प्रवेश करणाऱ्या आदिशक्ती मुक्ताईच्या आषाढी पालखीचे आज बुलढाणा नगरीत आगमन झाले. पालखीने खेळीयाचे अभंग गात विठूनामात तल्लीन होत सात किलोमीटरचा अवघड राजूर घाट माऊलीच्या कृपाशीर्वादाने सोपा करीत पार केला. आडवळणे पार करीत आणि राजूर घाटात असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिराला मनोमनी प्रणाम करून शंभर दिंड्यातील वारकरी, भाविक घाटावरील बुलढाणा नगरीत दाखल झाले.

हजारो बुलढाणेकरांनी आज शुक्रवारी सायंकाळी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. तब्बल १०० दिंड्यांचा सहभाग, रथ ओढणारी खिल्लारी बैलांची जोडी, रथाला करण्यात आलेला फुलांचा साज, विठुमाऊली आणि आदिशक्ती मुक्ताबाईंचा जयघोष करणारे शेकडो वारकरी, असे मनोहारी दृश्य डोळ्यात आणि मनात साठवून हजारो बुलढाणेकर धन्य झाले. जुन्यागावातील हनुमान मंदिर संस्थानमध्ये पालखी आज शुक्रवारी मुक्कामी आहे . शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी हनुमान मंदिरात रीघ लागल्याचे पहावयास मिळाले. पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या रात्रीच्या भोजनाचे यजमान वसंत राव जोशी आणि सुनील पांडे परिवार आहे.

आणखी वाचा-१७ वर्षांपासून एका फाईलवर कसे बसू शकता? भूखंड घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

यापूर्वी संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथून पालखीने १८ जून रोजी प्रस्थान केले होते. दसरखेड, मलकापूर, दाताळा, यानंतर मोताळा तालुक्यातील शेलापूर, तालखेड, टाकरखेड, तांदुळवाडी, मोताळा गावांचे आदरातिथ्य घेतले. घाटाखालील गावात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. भाविकांनी आई मुक्ताईस पाऊस भरपूर पडावा साकडे घातले.

मोताळा मुक्कामावरून अंत्री, शिरवा, टाकळी, वाघजाळ मूर्ती या गावाचा सन्मान घेत पालखी राजुर येथे पोहचली. तेथिल ग्रामस्थांची सेवा घेता घाट चढण्याकरिता वारकरी मार्गस्थ झाले. पाच किलोमीटरचा राजूर घाट एकटाकी चढणे सोपे नव्हे. मात्र तुकोबारायांच्या ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट! तरावया भवसागर रे’ या अभंग पंक्तीप्रमाणे वारीने हसतखेळत राजूर घाट पार केला.

आणखी वाचा-पालकमंत्री पद झेपणार नाही, हे अजित पवारांना आधीच…

उद्या शनिवारी सकाळी रामनगरात दुपारचा विसावा घेऊन येळगाव येथे मुक्कामासाठी सोहळा मार्गस्थ होईल. शनिवारचे अन्नदाते शैलेश कुलकर्णी आणि प्रल्हाद किकराळे हे आहेत. रविवारी हातनी मार्गे कूच करणारी मुक्ताईची पालखी रेणुकानगरी चिखली येथे २३ तारखेला मुक्कामी राहणार आहे. यानंतर २४ला बेराळा फाटा, भरोसा फाटा,२५ ला अंढेरा फाटा व देऊळगाव मही असा पालखीचा मार्ग आहे. २६ तारखेला गणपती मंदिर आळंद येथे मध्यान्ही विसावा घेत रात्री मुक्ताईची पालखी बालाजी नगरी देऊळगाव राजा येथे मुक्कामी राहील. हा पालखीचा बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम राहील. यानंतर पायदळ वारी बुलढाण्याचा निरोप घेऊन वाघरुळ, जालना मार्गे मराठवाड्यात प्रवेश करणार आहे.