लोकसत्ता टीम
नागपूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला व बालविकास मंत्रालयाचा अंदाज आहे की राज्यातील अडीच कोटी महिलापर्यंत ही योजना विस्तारली जाईल, असा दावा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वर्तवला.
नागपुरातील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबी मंदिराला सोमवारी आदिती तटकरे यांनी भेट दिली. याप्रसंगी महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यावर आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदिती तटकरे पुढे म्हणाली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्याअखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचा लाभ दिला आहे.
हेही वाचा >>>गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्या सत्तेची मस्ती’
दरम्यान सप्टेंबर अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिला पात्र ठरतील. महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंदाजानुसार अडीच कोटी महिलांपर्यंत ही योजना विस्तारली जाण्याचा अंदाज आहे. या योजनेसाठी सुरुवातीला ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहे. म्हणून मुदत वाढवण्यात आली. दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत पंधराशे रुपयांचा लाभ पोहोचावा असा महिला व बालविकास मंत्रालयाचा प्रयत्न आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यानी अर्ज भरले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यात लाभ मिळेल.
हेही वाचा >>>आरोग्य खात्याचा गलथानपणा, डेंग्यूबाधितांना जमिनीवर झोपवून उपचार
शक्ती कायद्याबाबतही महत्वाचे संकेत
महिलांची सुरक्षा महत्त्वाचा विषय आहे. मात्र, महिलांसाठीची योजना एक भाग आहे आणि महिलांना सुरक्षितता देणे दुसरा भाग आहे. राज्यातील महिला भगिनी सुरक्षित राहावे हे सर्वांचच उद्दिष्ट आहे. यात राजकारण आणण्याचे कारण नाही. महाराष्ट्र सरकारने शक्ती कायदा प्रस्तावित केला होता. राज्याच्या प्रस्तावित शक्ती कायद्याच्या बहुतांशी बाबी केंद्र सरकारच्या कायद्यात आल्या आहेत. उर्वरित बाबी शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. त्यातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहितीही महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण योजना काय?
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या अंतर्गत महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये याप्रमाणे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास १५ ऑगस्टच्या पूर्वीपासूनच सुरूवात झाली आहे. योजनेबाबत महिलांमध्ये आकर्षणही बघायला मिळत आहे.