नागपूर : राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. पण सरकारकडून दखल घेतली जात नाही. आंदोलनात लाठीमार झाल्यावर कुणीतरी अधिकारी निलंबित केला जातो, पण लाठीमाराचा आदेश देणाऱ्या जनरल डायरचे काय, असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ४० आमदारांचे सदस्यत्व रद्द होणे आवश्यक आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाप्रमाणे न्याय देणारी असली पाहिजे.
यानंतर ते मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपूरमार्गे रवाना झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी सावनेर येथे आयोजित कार्यक्रमात ठाकरे म्हणाले, इंडिया, भारत, हिंदुस्थान ही नावे वेगवेगळी असली तरी आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत. या देशाची लोकशाही टीकवायची आहे. पण आज देशात लोकशाही उरलेली नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात दीड वर्षांपासून घटनाबाहा सरकार आहे. देशाचे संविधान प्रत्येकाला न्याय व अधिकार देणारे आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे. मात्र ते आपल्याला बदलू द्यायचे नाही. देशात परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. होर्डिंग, बॅनर व प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. पण दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलेली नाही. वारकरी, महिला, मराठा समाजावर लाठीमार होत आहे. गणपतीच्या मिरवणुकीत एका आमदाराने गोळीबार केला पण कारवाई झाली नाही. असा सरकारचा कारभार सुरू असल्याची टीकाही ठाकरेंनी केली. याप्रसंगी आमदार सुनील केदार उपस्थित होते.