नागपूर : मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
कल्याण येथील योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला व विजय कळवीकट्टे त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून वाद झाला. शुक्ला यांच्या पत्नी घराबाहेर लावत असलेल्या धुपच्या धुरामुळे कळवीकट्टे कुटुंबातील लहान मूल व वृद्ध व्यक्तीला त्रास झाला. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार यासंदर्भात शुक्ला यांना सांगितण्यात आले. मात्र, प्रकरण शिवीगाळ, मारहाणीपर्यंत गेले. त्याच मजल्यावर राहणारे अभिजित देशमुख व धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग धरून शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांना मारहाण केली. या प्रकरणामुळे सध्या राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषिकांवरील अन्यायाचा मुद्दा पेटला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘कल्याणमधील घटना ही केवळ दुर्दैवीच नाही तर निराशाजनक आहे. मागील दीड ते दोन वर्षांत मुंबईतील मराठी रहिवाशांना विविध वादविवाद आणि समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
हेही वाचा – कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
एका मराठी महिलेवर हिंदीत बोलण्याचा दबाव आणल्याचे प्रकरण पुढे आले आहे. मुंबई आधी महाराष्ट्राची आहे आणि नंतर भारताची. देशभरातील लोक येथे येऊन आनंदाने राहतात. पण, जेव्हा कुणी मराठी ओळख कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा येथील मराठी तरुण शांत बसणार नाही.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्या बिल्डर आणि हाउसिंग सोसायट्यांवर कडक कारवाईचीही मागणी ठाकरे यांनी केली.