नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर वाद उठल्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह दीक्षाभूमीला भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती त्यामुळे कोट्यवधी अनुयायांसाठी दीक्षाभूमी महत्वपूर्ण ठिकाण आहे. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी काही आमदारांसह दीक्षाभूमीला भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या वक्त्यव्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दीक्षाभूमीला भेट देत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी ठाकरे यांनी शहांच्या वक्त्यव्याचा खरपूस समाचार घेतला.
अपमान करणे त्यांच्या मनात
संविधानाच्या माध्यमातून करोडो लोकांना हक्क देणारे आंबेडकर लोकांसाठी देवच आहेत. भाजपची मानसिकता संविधानाचा अपमान करणे ही आहे. संविधानावर चर्चा करताना संविधानाचा अपमान झाला आहे, असे ठाकरे म्हणाले. अपूर्ण व्हि़डिओ दाखवून चुकीचा संदेश देण्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरही देखील आदित्य ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. १२ सेकंडच्या व्हिडिओत गृहमंत्री बोलले ना त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रश्न कुठे आहे? आंबेडकरांचा अपमान करणे त्यांच्या मनात होते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. बोटी उलटल्यावर जसा वाचविण्याचा प्रयत्न होत आहे तसेच प्रयत्न मोदींकडून होत आहेत. पंतप्रधानांनी काही दिवस त्यांना दूर करावे, असा सल्लाही ठाकरे यांनी मोदींना दिला. यावेळी अंबादास दानवे देखील ठाकरे यांच्यासोबत होते. काही वेळानंतर भास्कर जाधव यांनीही दीक्षाभूमीला भेट दिली. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर त्यांना माफ करा अशी प्रार्थना बाबासाहेबांना करण्यासाठी दीक्षाभूमीत आलो आहे, अशी भावना भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
हेही वाचा…नागपुरात थरार! कपिलनगरात कुटुंबीयांना ओलिस ठेवून दरोडा, अधिवेशनादरम्यान घटना घडल्याने खळबळ
देशभरात शहांचा विरोध
अमित शहा राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” या विधानाआधी अमित शहा म्हणाले होते की, आंबेडकरांचे नाव तुम्ही १०० वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो. शहा यांच्या या विधानानंतर देशभरात त्यांच्या विरोध केला जात आहे. अमित शहा यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून या विधानाचा निषेध केला आहे. “ज्यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे, त्यांना आंबेडकरांची अडचण असते”, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.