यवतमाळ : देशात भाजप मित्रपक्षांना ‘वापरा आणि फेका’ या नीतीने वागवत आहे. केंद्रातील महाशक्ती आता तानाशाहीत बदलली आहे. त्यामुळे देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून, महाराष्ट्रातही गद्दारांना घरी बसवून महाविकास आघाडीचे अधिकाधिक खासदार निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना (उबाठा) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केला.
येथील पोस्टल मैदानात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते आज मंगळवारी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार रोहित पवार, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, उमेदवार संजय देशमुख आदी उपस्थित होते.
हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ
यवतमाळमधील आजचे वातावरण बघून येथे महाविकास आघाडी जिंकणारच असा विश्वास वाटत असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हेच भाजपचे मित्रपक्ष आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली. भाजपसोबत कोणीही नव्हते तेव्हा शिवसेना सोबत होती. मात्र त्यांचे अच्छे दिन आले तेव्हा त्यांनी शिवसेनशी युती तोडली. वापरा आणि फेका हेच भाजपचे धोरण आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडून त्यांच्यासोबत गेलेल्या गद्दारांची स्थिती आज अत्यंत बिकट झाल्याचे ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीने लोकांमधील उमदेवार दिला. मात्र यवतमाळ-वाशिममध्ये महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नाही. ते महाविकास आघाडीच्या ताकदीला घाबरले आहेत, असे ठाकरे म्हणाले. जो कोणी अधिक बोली देईल त्याला उमेदवारी मिळू शकते. खोके घेणे आणि धोके देणे हे त्यांचे कामच आहे, अशी टीका करत ‘अबकी बार भाजप तडीपार’ असा नारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा – वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…
यावेळी बोलताना रोहित पवार यांनीही यवतमाळ आणि वाशिमचे लोक जे ठरवतात, तेच करून दाखवतात, असे सांगितले. महायुती जनतेत जाण्यास घाबरत असल्याने त्यांना उमेदवारही मिळत नसल्याची टीका पवार यांनी केली. ऐनवेळी निवडणूक लढविण्यास इच्छुक नसलेला उमेदवार महायुती जनतेवर थोपवेल, असे पवार म्हणाले. महायुतीतील सर्व आमदार, खासदारांनी विचार सोडला, जनतेला वाऱ्यावर सोडले, निष्ठा सोडली व पळून गेले आणि दिल्लीसमोर झुकले, अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली. यावेळेची लोकसभा निवडणूक जनतेने व निष्ठावान कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे, म्हणून महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असे पवार म्हणाले.
याप्रसंगी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी, भाजपने आजपर्यंत केवळ धर्माच्या नावावर देशात दुही माजवली. विकासाची कोणतीच कामे केली नाहीत, असा आरोप केला. उमेदवार संजय देशमुख यांनी विद्यमान खासदारांवर टीका करून त्यांनी व महायुतीतील आमदारांनी जिल्ह्यात विकासाचे एकही काम केले नसल्याचा आरोप केला. या प्रचारसभेनंतर उपस्थितांनी शक्तीप्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयात संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. सभेस व रॅलीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.