गोंदिया : एकीकडे मणिपूर राज्यासह संपूर्ण देशात आदिवासी बांधवांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने खासदार पुरस्कृत आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करीत आदिवासी समाज संघटनांकडून या महोत्सवाला विरोध दर्शविण्यात आला होता. हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली होती. आदिवासी समाजातील असंतोष लक्षात घेत २० ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांस्कृतिक मंत्रालय दिल्लीच्यावतीने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सडक अर्जुनी येथे २० ऑगस्टला जिल्हा व तालुकास्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मणिपूर राज्यात घडलेल्या आदिवासी महिलांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत कठोर शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव रद्द करण्यात यावा, अशी मागणी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, आदिवासी समाज संघटना, ऑल इंडिया हलबा समाज नॅशनल आदिवासी संघटना, आदी संघटनांनी केली होती. याची दखल घेत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.

हेही वाचा – “ना कबुतर आया, ना फोन…”, ॲड. प्रकाश आंबेडकर असे का म्हणाले?

हेही वाचा – वाशिम : जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारती, अपुरे शिक्षक; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण की शिक्षा?

सदर आदिवासी सांस्कृतिक महोत्सव २० ऑगस्ट रोजी होणार नाही. हा कार्यक्रम अपूर्ण तयारी व विविध सामाजिक संघटना यांच्याशी बोलणी न झाल्याने तूर्तास तरी स्थगित करण्यात आल्याची माहिती गोंदिया-भंडाराचे खासदार सुनिल मेंढे यांचे स्वीय सचिव अविनाश खेडीकर यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adivasi cultural festival finally suspended due to tribal opposition in gondia sar 75 ssb