गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव केंद्रावर धान आणि बारदाना खरेदीत दीड कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी यासंदर्भात संबंधित केंद्राचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी धान खरेदी हंगामात कोट्यवधींचा घोटाळा समोर येत असतो. याप्रकरणी वर्षभरापूर्वी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार याला अटक देखील करण्यात आली होती. यंदाही आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव खरेदी केंद्रावर १ कोटी ५३ लाखांचा गैरव्यावहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी देऊळगाव खरेदी केंद्रावर भेट दिली असता त्यांना २०२३-२४ हंगामात खरेदी करण्यात आलेले धान आणि बारदाण्याविषयी संशय निर्माण झाला. त्यांनी तात्काळ चौकशी समिती मार्फत तपासणी केली असता कागदावर असलेल्या १९८६० क्विंटल धान आणि ४९७५१ बारदान्यात ३९४४ क्विंटल धान व १४१४८ बारदान्याची तफावत आढळून आली. इतकेच नव्हे तर भरडाईकरिता पाठविण्यात आलेल्या एका बारदान्यात ४० किलो ऐवजी ३० किलो धान भरण्यात आल्याचेही दिसून आले.
प्रथमदर्शनी यात एकूण १ कोटी ५३ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रादेशिक व्यवस्थापक सांबरे यांनी संबंधित खरेदी केंद्राच्या अध्यक्षाला व महामंडळाच्या अधिकाऱ्याला नोटीस बाजावली असून दोषींवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच हंगाम २०२४-२५ च्या खरेदीची सुद्धा चौकशी करण्यात येत असल्याने या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी प्रादेशिक व्यवस्थापक सांबरे यांना संपर्क केला असता त्यांनी दुजोरा दिला आहे.
कुरखेडा कार्यालय संशयाच्या फेऱ्यात
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गडचिरोलीतील धान घोटाळ्यावर वादळी चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. हे प्रकरण शांत होत नाही तोच पुन्हा एक घोटाळा पुढे आल्याने आदिवासी विकास महामंडळाचे कुरखेडा उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय खरेदी केंद्रावरील पदाधिकारी एवढा मोठा घोटाळा कसा काय करू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या कार्यालयातील एक अधिकारी बऱ्याच वर्षपासून येथे कार्यरत असून राईस मिल धारकांकडून त्याने वरिष्ठांच्या नावावर कोट्यवधींची वसूली केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.