लोकसत्ता टीम
यवतमाळ : नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच स्त्री रुग्णालयास शनिवारी भेट देऊन आढावा घेतला.
आरोग्य यंत्रणेची पाहणी करून रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा, रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासोबतच रुग्णालयीन सेवा, सुविधेच्या उपलब्धतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आरोग्य प्रशासनास निर्देश दिले. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी रुग्णसेवा व स्वच्छतेचा सविस्तर आढावा घेतला. विशेष म्हणजे महाविद्यालयातील बालके व महिलांच्या वार्डांसह सर्वच वार्डांची पाहणी केली. वार्डातील स्वच्छता, रुग्णांना दिल्या जात असलेल्या सुविधांची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. महाविद्यालयातील औषधीसाठा, अत्यावश्यक यंत्रसामुग्रीची देखील पाहणी केली.
आणखी वाचा-प्रेम प्रकरणाची कुणकुण पोहचली घरात… अन् प्रियकराविरुद्ध गुन्हा
दोन्ही रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घ्या. रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्त्री रुग्णालयातील अडीअडचणी व समस्यांची देखील त्यांनी माहिती घेतली. अत्यावश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे, असे ते म्हणाले. बालमृत्यू दर पूर्वी ४.६ टक्के इतका होता आता तो ३.७ टक्के इतका खाली आला असल्याचे यावेळी वैद्यकीय प्रशासनाने यावेळी सांगितले. स्त्री रुग्णालयात भेटी प्रसंगी प्रसुतीगृह, वार्ड, शस्त्रक्रीयागृहाची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगडपल्लेवार, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवी पाटील उपस्थित होते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.आनंद आशिया, मेडीसिन विभाग प्रमुख डॉ.बाबा येलके, बालरोग विभाग प्रमुख डॉ.अजय केशवाणी, स्त्रीरोग विभागाचे डॉ. वऱ्हाडे, डॉ.अजय कुसुंबिवाल यांच्यासह विविध विभागाचे डॉक्टर्स उपस्थित होते.
आणखी वाचा-नागपूर : मजुराच्या बँक खात्यातून दोन कोटींची उलाढाल
औषधे खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रुग्णालयांना आवश्यक असलेल्या औषधे खरेदीसाठी निधी दिला जातो. जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील औषधींसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक औषधे खरेदीसाठी महाविद्यालयाला निधी निधी दिला जातो. या तिनही संस्थांच्या औषधे खरेदीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले. जिल्ह्यात कुठेही औषधांची कमतरता नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.