भंडारा : प्रधानमंत्री आवास योजनें अतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी ५ ब्रास वाळू विनामूल्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता घरकुलासाठी रेती उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाळू बुकींग करतांना संबंधित लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांकावर ओटीपीनुसार बुकींग करण्यात येते आहे. यातून फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तींना ओटीपी देवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनें अंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांना यादी सादर केली. ज्यात संबंधित तहसीलदार यांनी वाळू डेपोतून पाच ब्रास वाळू स्वामीत्वधन न आकारता विनामुल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार लाखनी तालुक्यातील वाकल येथील वाळू डेपो मधून ५ ब्रास पर्यंत विनामुल्य वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याकरीता गट विकास अधिकारी लाखनी यांनी सादर केलेल्या यादीनूसार तहसील कार्यालयामार्फत २ हजार ५३० घरकुल लाभार्थ्यांची नावे महाखनिज या संगणक प्रणालीवर नोंद घेण्यात आलेली आहे. महाखनिज प्रणालीवर लाभार्थ्यांची नोंद विनामुल्य घेण्यात येते. नोंद घेतलेल्या घरकुल लाभार्थ्यापैकी ५७० घरकुल लाभार्थ्यांनी २७७२ ब्रास बुकींग केली आहे. व त्यापैकी १०१५ ब्रास वाळू उचल केलेली आहे.
वाळू वाहतुकीकरीता “महाखनिज” या संगणक प्रणालीचा वापर करण्यात येते. या संगणक प्रणालीमध्ये घरकुल लाभार्थ्यांची नोंद विनामुल्य घेण्यात येते व अधिकृत सेतू केंद्रामार्फत वाळू बुकींग करण्यात येते. ही सेवा तहसील कार्यालयातील सेतूमध्ये विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
वाळू बुकींग करतांना संबंधित लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांकावर ओटीपीनुसार बुकींग करण्यात येते. घरकुल लाभार्थ्यांनी अज्ञात व्यक्तींना आपला ओटीपी देवू नये असे आवाहन करीत याबाबत गैरप्रकार किंवा फसवणूक झाल्यास संबंधित व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा तहसीलदार धनंजय देशमुख यांनी दिला आहे.