अकोला : जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चतारी येथे विषमज्वर चाचणीमध्ये रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चतारी येथे विषमज्वर आजाराचा उद्रेक प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथकाने चतारी येथे प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक प्रक्रिया सुरू केली. चतारी गावातील रुग्णांमध्ये ताप, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखीचे लक्षणे आढळून आले आहेत. तीन रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले जात असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
दूषित पाण्यासह इतरही कारणामुळे पातूर तालुक्यातील चतारी गावामध्ये साथ रोगाने पाय पसरले आहेत. गावात अनेक रुग्ण आढळून येत आहेत. चतारी गावामध्ये विषमज्वर आजाराची साथ निर्माण झाली. गावाची लोकसंख्या दोन हजार ३०० असून चतारीमध्ये ४२६ घरे आहेत. आज २६३ घरांतील एक हजार २४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ताप, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखीचे तीन रुग्ण सर्वेक्षणात आढळून आले आहेत. उपचार केल्याने पाच रुग्णांची प्रकृती सुधारली आहे.
चतारी ग्रामीण रुग्णालयात तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रक्त तपासणीमध्ये हे तीन रुग्ण विषमज्वरने बाधित आढळले. गेल्या काही दिवसांत गावामध्ये ताप, मळमळ, पोटदुखीचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १० रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. एकूण चार पथके चतारी गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. पिण्याचे पाणी उकळून व आर.ओ. पाण्याचा वापर करण्याचे नागरिकांना आरोग्य शिक्षण दिल जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक प्रत्येकी एक जण, आरोग्य सेवक चार, आरोग्य सेविका दोन, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका पाच असे मनुष्यबळ कार्यरत आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग तज्ज्ञ आदींनी चतारी येथे भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना साथ नियंत्रणासाठी सूचना दिल्या आहेत. ताप, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी आदी कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करुन घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पाणी नमुन्याचे अहवाल प्रलंबित दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथ रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुद्धा तपासणी केली जात आहे. तपासणीसाठी पाण्याचे पाच नमुने घेतले. त्याचे अहवाल प्रलंबित आहेत.