वर्धा : विविध प्रकारच्या सोळा शासकीय सेवा घरपोच देणारा ‘सेवादुत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम प्रशासनाने सुरू केला असून राज्यात असा हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा केला आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा सेवादुत कर्मचारी पूर्व सुचनेवर लाभार्थ्यांच्या घरी जात सेवा देईल. जिल्हा प्रशासनाने यासाठी खास ‘ॲप’देखील तयार केले आहे.
सामान्यांना विविध सेवा सहज आणि कमी त्रासात उपलब्ध होण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहे. त्यामुळे गावस्तरावरच या सुविधा कालमर्यादेत उपलब्ध होत आहे. यापुढे जात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना घरीच सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘सेवादुत’ नावाची स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे.
हेही वाचा >>> मागासवर्गीयांचा ३० हजार कोटींचा निधी अखर्चित; अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विकासाला खीळ
प्रकल्पाच्या ‘सेवादूत’ नावाने तयार करण्यात आलेल्या ‘ॲप’द्वारे लाभार्थ्यांने फक्त नाव, पत्ता, संपर्क क्रमांक ही प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सेवादुत’ हे वेळ घेऊन लाभार्थ्यांच्या घरी येतील. त्यांना पाहिजे असलेल्या सेवांचे कागदपत्र सेवादुत घरीच स्कॅन करून घेतील. त्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल केल्या जाईल. लाभार्थ्याचा दाखला किंवा प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला घरपोच नेऊन देतील. ही सर्व सुविधा लाभार्थ्याला घरीच उपलब्ध होणार असल्याने यासाठी घराबाहेर कोणत्याही कार्यालयात जावे लागणार नाही.
प्रायोगित तत्वावर सुरुवातीस वर्धा शहरात हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात वय व राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, तात्पुरते निवासी प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पत दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवानगी, साक्षांकित प्रत, नॅान क्रिमिलेयर, भूमिहीन प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, सर्वसाधारण ॲफिडेव्हीट, लघु शेतकरी प्रमाणपत्र, झाडे तोडण्याची परवानगी अशा प्रमाणपत्रांचा समावेश आहे. राज्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवतो आहे. सर्वसाधारण कामांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागू नये, त्यांना सहज आणि कालमर्यादेत घरीच सेवा मिळावी, हा या मागील उद्देश आहे. यासाठी आपण स्वतंत्र अँप देखील विकसित केले आहे. यावर प्राथमिक स्वरुपाची माहिती भरुन सेवादूताची अपाँईनमेंट घेतल्यानंतर घरपोच सेवा उपलब्ध होऊ शकेल. प्रायोगिक तत्वावर वर्धा शहरात व पुढे जिल्हाभर हा उपक्रम राबविला जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.