नागपूर : प्रशासकीय कामकाज तसे किचकट, गोडी नसणारे आणि वेळखाऊ. तोच-तोच पणा यामुळे अधिकाऱ्यांमध्ये निरसपणा येतो. तो घालवण्यासाठी आण नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून प्रशासनाला गतिमान करण्यासाठी राज्य शासनाकडून काही स्पर्धात्मक उपक्रम राबवले जाते. प्रशासकीय गतिमानता अभियान हा त्यापैकीच एक.२०२४-२५ या वर्षात नागपुरातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी या श्रेत्रात उत्तम कामगिरी करीत आपल्या कौशल्याची छाप सोडली.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन शाखेतर्फे दरवर्षी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबवले जाते. २०२४-२५ या वर्षासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी राबवलेल्या उपक्रमाला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर झाले होते. सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘ई-पंचनामा ॲप’ साठी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. विपीन इटनकर यांना उत्कृष्ट संकल्पना व उपक्रम या गटात पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो डॉ. इटनकर यांना मुंबई येथील कार्यक्रमादरम्यान प्रदान करण्यात आला. इटनकर यांनी जिल्ह्यात राबवलेल्या ‘दवाखाना आपल्या दारी’ या उपक्रमाची निवड झाली होती. महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या आर्थिक नियोजन प्रणालीसाठी नागपूर महापालिकेला हा पुरस्कार जाहीर झाला होता. आयुक्त अभिजत चौधरी यांनी तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला.