भाग दोन
मंगेश राऊत
मराठा समाजासाठी लागू करण्यात आलेल्या एसईबीसी आरक्षणाची अंमलबजावणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नियमानुसार करण्यात आली. पण, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एसईबीसीला झुकते माप देऊन अधिकच्या जागा निश्चित करण्यात आल्या. यामुळे इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना आहे.
राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मंजूर जागांवरील प्रवेश प्रक्रिया किचकट आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मंजूर जागांच्या ८५ टक्के जागांवर राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश देण्यात येतात. उर्वरित १५ टक्के जागा केंद्र सरकारकडून भरण्यात येतात. खासगीमध्ये मंजूर जागांच्या ५०-५० टक्के जागा केंद्र व राज्य सरकारकडून भरण्यात येतात. अशावेळी विविध प्रवर्गाना उपलब्ध जागांनुसार निश्चित करण्यात येते. परंतु राज्यात एसईबीसी आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत जागा निश्चित करताना घोळ करण्यात येत आहे.
२०१८ मध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते आरक्षण १२ टक्के इतके झाले. त्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इतर प्रवर्गाप्रमाणे एसईबीसीलाही एकूण १२ टक्के आरक्षणानुसार जागा निश्चित करण्यात आल्या. दुसरीकडे खासगी महाविद्यालयांमधील केवळ ५० टक्के जागा राज्य सरकारद्वारा भरण्यात येत असताना एसईबीसीला १२ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्या ठिकाणी इतर प्रवर्गाना मंजूर आरक्षणाच्या निम्मे आरक्षण देण्यात आले आहे. वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत खासगी महाविद्यालयांमधील जागांवर एसईबीसीला झुकते माप मिळत असल्याने इतर प्रवर्गावर अन्याय होत आहे. यासंदर्भात सीईटी आयुक्त संदीप कदम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दस्तावेजांची पडताळणी करून प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व्हॉट्सअॅपवर प्रश्न मागवले. प्रश्न पाठवल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली नाही.
शासकीयमध्ये सर्वाधिक जागा ओबीसींना
सर्वाधिक १९ टक्के आरक्षण ओबीसीला असून त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नियमांचे पालन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमडी, एमएस) १ हजार १६८ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यापैकी एससी १५२, एसटी ८२, व्हीजेएनटी १२८, ओबीसी २२२, एसईबीसी १४०, ईडब्ल्यूएसला ११७ आणि खुल्या प्रवर्गासाठी ३२७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
खासगीत खुल्या प्रवर्गातील जागा कमी
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी, एमएस अभ्यासक्रमाच्या ६१९ जागा आहेत. त्यापैकी एससी ४०, एसटी २२, व्हीजेएनटीला ३४, ओबीसीला ५९, एसईबीसीला ७४ तर खुल्या प्रवर्गासाठी ८७ जागा उपलब्ध आहेत. उर्वरित २१८ जागा व्यवस्थापन आणि अनिवासी भारतीयांसाठी ८५ जागा आरक्षित आहेत. एसईबीसीला एकूण जागांवर संपूर्ण १२ टक्के जागा देण्यात आल्या आहेत. इतर प्रवर्गाना उपलब्ध जागांवर निम्मे आरक्षण देण्यात आले. एसईबीसीला नियमबाह्य़पणे सर्वाधिक जागा देण्यात आल्याने खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्या आहेत.