नागपूर: नागरिकांना कोणत्या आजाराचा केव्हा त्रास होईल हे सांगता येत नाही. परंतु अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) संध्याकाळी सहा वाजतानंतर उपचारासाठी आलेल्या रुग्णाला दाखल केले जात नाही, अशा तक्रारी आहेत. सायंकाळी सहा नंतर आलेल्या रूग्णांना दाखल करून घ्या, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एम्सच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
हेही वाचा >>> वर्धा : पंतप्रधान मोदींबाबतच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; नाना पटोलेंचा पुतळा जाळला
एम्सच्या चवथ्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. एम्सच्या स्थापनेपूर्वी व स्थापनेनंतर बऱ्याच चर्चा झाल्या. नागपूरला एम्स यावे यासाठी मंत्र्यांना भेटलो. प्रथम जागेचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला.मिहानमध्ये जागा उपलब्ध केली. आता हळूृ- हळू एम्स मोठा आकार घेत आहे. परंतु नागरिकाला कोणताही आरोग्याचा त्रास केव्हाही उद्भवतो.संध्याकाळी सहानंतर येथे रुग्णाला दाखल केले जात नाही हे योग्य नाही. त्याबद्धतीची तक्रार त्यांच्याकडे नागरिक घेऊन येत असल्याचे गडकरी म्हणाले. एम्समध्ये सिकलसेल, थॅलेसेमिया या मागासवर्गीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या आजारांवर संशोधन व उपचार व्हावे. अस्थिमज्जा प्रत्यारोपणासह इतरही अद्यावत सुविधा व्हाव्या. गरीबांना माफक दरात उपचार होण्याची आशाही गडकरी यांनी वर्तवली.