नागपूर : आईबाप आधी मुलांना खाऊ घालतात आणि मग स्वतःच्या पोटात दोन घास घालतात.मात्र, मुले खात असतील तर त्यांच्या तोंडातला घास ते कधीच हिरावत नाही. मग ते माणसांच्या बाबतीत असो, वा प्राण्यांच्या बाबतीत. गोरेवाड्यात मात्र, विपरितच घडले. एका प्रौढ अस्वलाने चक्क पिल्लाच्या तोंडचा घास हिरावला. एवढेच नाही तर त्यासाठी त्या पिल्लाला जखमी देखील केले. ही जखम एवढी खोलवर होती की त्या पिल्लाचा अखेर पाय कापावा लागला. दरम्यान, एवढी मोठी घटना घडूनही प्राणिसंग्रहालयाच्या अभिरक्षकाला जबाबदारीची जाणीव देखील झाली नाही.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात मोठ्या अस्वलाने अवघ्या पाच महिन्याच्या अस्वलावर हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही जखम एवढी मोठी होती की शरीराच्या इतर भागावर परिणाम होऊ नये म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अस्वलाच्या पिल्लाचा पाय कापावा लागला. प्राणीसंग्रहालयात अस्वलांसाठी फळे आणण्यात आली. यावेळी अस्वलाचे लहान पिलू पिंजऱ्यात होते. याठिकाणी अस्वलाच्या पिंजऱ्यामध्ये लहान कक्ष आहेत. या कक्षातून पिंजऱ्यात येण्यासाठी लहान प्रवेशद्वार आहेत. पिंजऱ्याच्या सळाखीतून अस्वलाचे लहान पिलू ती फळे ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याचवेळी मोठ्या अस्वलाने त्या पिल्लावर हल्ला केला.

अस्वलाच्या हल्ल्यात त्या पिल्लाचा पाय गंभीर जखमी झाला. जखमी पिल्लाला गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आणण्यात आले. संपूर्ण शरीरात जखम पसरण्याचा धोका लक्षात घेता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा पाय कापण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेनंतर अस्वलाच्या पिल्लाची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी याच प्राणीसंग्रहालयात हायनाच्या पिल्लांचा देखील मृत्यू झाला. त्या पिल्लांना मादी व नर हायनापासून वेगळे करण्यात आले होते. काही दिवसानंतर त्यांना परत सोडण्यात आले. मात्र, यादरम्यान मादी व नर हायनाने त्यांच्या पिल्लांना मारल्याची माहिती सुत्रांनी दिली. या दोन्ही घटनांची माहिती घेण्यासाठी प्राणीसंग्रहालयाचे अभिरक्षक दीपक सावंत यांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी तो बंद केला व कुठलाच प्रतिसाद दिला नाही. यांपूर्वी देखील अभिरक्षकांना प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूविषयी विचारणा केली असता त्यांनी ही जबाबदारी गोरवाड्यातील अधिकाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या अभिरक्षकाची नेमकी जबाबदारी काय, असा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे.