लोकसत्‍ता टीम

अमरावती : दुधात पाण्‍याची भेसळ या घटना सामान्‍य समजल्‍या जात असल्‍या, तरी गुरांना पाणी पिण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या हौदातील पाणी दुधाच्‍या कॅनमध्‍ये मिसळण्‍याचा धक्‍कादायक प्रकार सीसीटीव्‍ही कॅमेरामुळे उजेडात आला आहे. येथील मिनी बायपास मार्गावर एमआयडीसी परिसरातील ही घटना सध्‍या समाज माध्‍यमांवर प्रसारीत झाली आहे. या प्रकरणी अन्‍न व औषध प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमआयडीसी परिसरातील एका मार्बल दुकानासमोर जनावरांना पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध व्‍हावे, म्‍हणून हौद तयार करण्‍यात आला आहे. या मार्गावरून जाणारी जनावरे या हौदातील पाणी पितात. याच हौदातील पाणी काही दुधविक्रेते दुधाच्‍या कॅनमध्‍ये टाकत असल्‍याचे दृश्‍य सीसीटीव्‍ही कॅमेरात बंदिस्‍त झाले आणि हा धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला. गुरांच्‍या हौदातील पाण्‍याची दुधात भेसळ करण्‍याचा हा प्रकार एकाने नव्‍हे, तर इतर दोन जणांनी हौदातील पाणी कॅनमध्‍ये मिसळल्‍याचे सीसीटीव्‍हीत दिसत आहे. याकडे अन्‍न व औषध प्रशासन लक्ष देणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! लग्नाला जात असलेल्या एका दुचाकीस्वाराचा चिनी मांजाने गळा चिरला

वाढत्या नफ्यासाठी पाण्यात भेसळ करतात. यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते आणि पाणी दूषित असल्यास आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. व्‍यावसायिकांची नफेखोरी चार दोन पैशांसाठी इतरांचे आरोग्‍य धोक्‍यात टाकणारी आहे. ग्राहक कितीही चतूर असले तरी भेसळ करणा-या टोळ्या नवनवीन युक्‍त्या शोधतात. प्रत्‍येकाच्‍या घरात दूध हा अत्‍यंत महत्‍त्वाचा पदार्थ आहे. वाढत्‍या लोकसंख्‍येबरोबर दुधाची मागणीही वाढली आहे.

दुषित पाण्‍यात रोगकारक विषाणू, जीवाणू असतात. ते दुधात मिसळल्‍यास आरोग्‍याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: असे दूध लहान मुलांसाठी अत्‍यंत अपायकारक आहे.

आणखी वाचा-नागपूर : स्फोटात सहा जणांचा कोळसा झालेल्या दारूगोळा कंपनीच्या मालकाला अखेर बेड्या, आता स्फोटामागची खरी माहिती…

भेसळ कशी ओळखावी

दुधात पाणी मिसळून त्याचे प्रमाण वाढवणे ही सर्वात सामान्य भेसळ पद्धतींपैकी एक आहे. तुमच्या दुधात भेसळ आहे का हे ओळखण्यासाठी एक सामान्‍य चाचणी आहे. साध्या काचेच्या तुकड्यावर दुधाचा एक थेंब ठेवा. शक्यतो हा तुकडा तिरका असेल असे पाहा. जरा दूध शुद्ध असेल तर ते शक्यतो वाहत नाही किंवा अत्यंत हळूवारपणे वाहते आणि त्याचे पांढरे ठसे उमटतात. दुसरीकडे, पाण्यामध्ये भेसळ केलेले दूध, काहीच चिन्ह न ठेवता लगेच वाहून जाईल. उकळण्यामुळे बहुतेक प्रकारचे बॅक्टेरिया, जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. परंतु दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी न फिल्टर केलेले नळाचे पाणी असेल, तर भेसळयुक्त दूध उकळूनही सर्व सूक्ष्मजंतू आणि रसायने नष्ट होत नाहीत, ही अशुद्धता नष्ट करण्यासाठी दूध किमान २० मिनिटे उकळण्याची गरज आहे, असे तज्‍ज्ञांचे मत आहे.