नागपूर : ज्येष्ठ अधिवक्ता के.एच.देशपांडे तरुणांसाठी रोल मॉडल होते. न्यायालयापुढे ते पूर्ण तयारीनिशी उभे राहायचे. त्यामुळे उच्च न्यायालयातील त्यांची प्रतिमा नव्या पिढीतील वकीलांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक ठरेल, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.
हायकोर्ट बार असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्या. गवई यांच्या हस्ते ॲड.देशपांडे यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विनय देशपांडे, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अतुल पांडे, सचिव ऍड. अमोल जलतारे आणि ऍड. श्रीधर पुरोहित उपस्थित होते.
हेही वाचा >>> ‘टीस’चा अहवाल सरकार उघड करीत नाही? धनगर, धनगड नेमका काय आहे घोळ?
ॲड. देशपांडे नवोदित वकीलांच्या विकासाकरिता आग्रही राहत होते. त्यांचा वकीलीतील संमर्पणभाव सर्वांसाठी आदर्श आहे. ते चालते फिरते विद्यापीठ होते, असेेही न्या.गवई म्हणाले. न्या.सिरपूरकर यांनी देशपांडे यांना निडर व्यक्तीची उपमा दिली. के.एच.देशपांडे यांच्यासारखे परिश्रंम घेण्याची ताकद स्वत:मध्ये निर्माण करा, असे आवाहन न्या.विनय देशपांडे यांनी केले. न्या.चांदूरकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सुमित जोशी यांनी केले.