अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वारंवार भेट घेतली. यावरून प्रकाश आंबेडकर नेमके कुणासोबत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्याला आता स्वत: आंबेडकर यांनीच स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू म्हणून इंदू मिल स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठका घेऊन चर्चा करावी लागते, तर राजकीय दृष्ट्या मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. राज्यात सध्या माझ्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत, असे ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर : क्रिकेटचा देव ताडोबात! सचिनला माया, तारा, बिजली अन् ‘बघिरा’चे दर्शन…
अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. मला दोन वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू, तर दुसरी राजकीय पक्षाचा अध्यक्ष म्हणून. त्या दोन भूमिकेतूनच माझा दोन्ही नेत्यांशी संवाद असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्ष व चिन्हावर एकनाथ शिंदे यांचा अधिकार असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे न्यायालयात दाद मागणार आहेत. त्या अपिलमध्ये निर्णय उलटा होईल. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना न्यायालयातून न्याय मिळेल. न्यायालयाचा जो निर्णय येईल तो आपल्याला मान्य करावाच लागेल. शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यामुळे सध्या भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यासाठी अनुकूल काळ आहे. त्यामुळे आगामी एप्रिल महिन्याच्या शेवटी राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात, असे भाकितही आंबेडकर यांनी वर्तवले. उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्षाची स्थापना करतो म्हटले तर किमान सहा महिन्याचा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले.