नागपूर : रामजन्मभूमीच्या लढ्यानंतर आता ज्ञानव्यापी मशीद मिळविण्यासाठी न्यायालयीन लढा दिला जात आहे. या लढ्यात हिंदू पक्षाकडून बाजू मांडण्याचे कार्य ॲड.विष्णु शंकर जैन करत आहे. नागपूरमध्ये औरंगजेब कबरीच्या वादामुळे झालेल्या हिंसेला एक आठवडा झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आयोजित एका व्याख्यानात ॲड.विष्णु शंकर जैन यांनी अकबराबाबत नवा वाद काढला. संविधानाच्या मूळ प्रतिमध्ये अकबराचे छायाचित्र का आहे? कोणत्या मानसिकतेतून हे छायाचित्र संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये समाविष्ट करण्यात आले, असे प्रश्न विचारत ॲड.जैन यांनी औरंगजेब नंतर आता अकबराच्या नावावर नवा वाद काढला आहे.

संविधानात अकबर, टिपू सुल्तान का?

लॉ फोरम नागपूरच्यावतीने अमरावती मार्गावरील रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील गुरुनानक भवनमध्ये ॲड. विष्णु शंकर जैन यांचे ‘वक्फ बोर्ड आणि समान नागरी संहिता – वास्तव’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. राम जन्मभूमी, ज्ञानव्यापी मशीदसाठी लढा देणारे वकील म्हणून ॲड.जैन प्रसिद्ध आहे. यावेळी त्यांनी प्रार्थनास्थळ अधिनियमाचा उल्लेख करत रामजन्मभूमी खटल्याला शेवटचा लढा असल्याचे सांगितले. हिंदूनी आता जागरूक होण्याची गरज आहे. न्यायालय आपण दाखल केलेली याचिका वारंवार फेटाळली तरी येत्या काळात न्यायालयात दाखल होणारी प्रत्येक याचिका भगत सिंहच्या बॉम्बप्रमाणे न्यायालयात ध़डकेल. हिंदूच्या विरोधातील न्यायिक भेदभावाविरोधात हिंदूनी संघटित होऊन आवाज उचलण्याची गरज असल्याचे ॲड.जैन यांनी सांगितले. संविधानाच्या मूळ प्रतिमध्ये भगवान रामाचे चित्र काढले आहे. ही अभिमानाची बाब आहे. मात्र, मूळ प्रतिमध्ये अकबरचे छायाचित्र समाविष्ट करण्यामागे काय मानसिकता होती? झाशीच्या राणीच्या चित्रासोबत टिपू सुल्तानचे चित्र का ठेवले? असे अनेक सवाल ॲड.जैन यांनी उपस्थित केले. संविधान सभेने २६ नोव्हेंबर रोजी भारतीय नागरिकांना संविधानाची शपथ दिली होती. याचा उल्लेख प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदात आहे. मग या शपथेच्या ३० वर्षानंतर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद शब्दाचा समाविष्ट करण्याचे का आठवले? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

नागरी संहितेचा हिंदूंना फायदा नाही

समान नागरी संहिता लागू करून हिंदूचा काहीही फायदा होणार नाही. दुसऱ्या धर्मातील समस्या आपण का सोडवायच्या? विवाहाचे किमान वय आणि विवाह संख्या हे दोन विषय सोडले तर समान नागरी संहितेचा हिंदूंना काहीही फायदा नाही. समान नागरी कायद्याच्या लागू करण्याची मागणी करून आपण चुकीच्या रस्त्यावर जात आहोत. आपण जर समान नागरी संहितेच्या माध्यमातून त्यांच्या धर्मातील दुरुस्ती करू तर ही आपली बौद्धिक हार असेल, असे परखड मत ॲड.जैन यांनी व्यक्त केले.