बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त  पन्नास लाख शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे.राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२  शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे. त्याचे वाटप  चालू  झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३६,३५८ शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा म्हणून १८ कोटी ३९ लाख रुपये  मंजूर झाले  आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारले होते. बुलढाण्यात ‘एल्गार महामोर्चा,  अन्नत्याग आंदोलन केल्यावर  २८ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी  शेतकऱ्यांनी  मुंबईत  धडक दिली होती. दरम्यान २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविकांत तुपकरांच्या  मागण्यांबाबत बैठक झाली. सह्यांद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांच्या  खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा करण्याच्या मागणीचाही समावेश होता. त्यानुसार  शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Story img Loader