वर्धा : महानगरात ८ लाख रूपये खर्च पडणारी हृदयावरील ‘मिनीमल इनवॅसिव्ह कार्डियाक’ ही शस्त्रक्रिया अद्ययावत समजल्या जाते.परंपरागत बायपास हृदयशस्त्रक्रियेत मोठा चिरा देणे किंवा छातीच्या बरगड्या बाजूला सारणे अथवा विभाजीत करणे आदी पद्धतींचा अवलंब होतो. त्यासाठी अनेक उपकरणांचा व तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. त्यामुळे परंपरागत शस्त्रक्रिया रूग्णासाठी काही प्रमाणात वेदनादायी ठरते. तसेच रूग्ण पूर्ववत होण्यासाठी बराच अवधीही लागतो.
मात्र ही मिनिमल इनवॅसिव्ह शस्त्रक्रिया या काळातील अत्याधूनिक पद्धती आहे. यात रक्तस्त्राव कमी, वेदना कमी, अतिदक्षता विभागात थांबण्याचा कालावधी कमी, शस्त्रक्रियेचे व्रण नाममात्र व जलदगतीने बरा होणारा रूग्ण, अशी माहिती विशेष हृदय शल्यचिकित्सक डॉ.सयाजीराव सरगार यांनी दिली. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात अश्या शस्त्रक्रियेचे अर्धशतक पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन सोहळा आयोजिण्यात आला होता.
हेही वाचा >>>आज ग्रामीण भागात झडत्यांनी गाजणार बैलपोळयाची संध्या
यावेळी डॉ.सरगार बोलत होते. डॉ.अजय केवलिया, डॉ.प्रसाद पाणबुडे, डॉ.अभिषेक इंगोले, उॉ.तनुर्षी कर, अर्चना सरोदे यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांनीही अनुभव कथन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.उदय मेघे म्हणाले की या रूग्णालयात विशेष योजनेत ही शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असल्याने ग्रामीण रूग्णांना मोठा दिलासा मिळतो. संस्थापक दत्ता मेघे यांनी विशेष योजना चालविण्यास प्रोत्साहन दिले असल्याचे ते म्हणाले.