चंद्रपूर : प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचा उद्योग समूह चंद्रपूरमध्ये ४० हजार कोटींची गुंतवणूक करून एक मोठा ‘स्टील प्लान्ट’ उभारणार आहे. ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर २०२४-इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’मध्ये एकाच दिवशी १९ उद्योग कंपन्यांशी ७५ हजार ७२१ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. देशाच्या निर्माणासाठी चंद्रपूर मैदानात उतरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले, तर चंद्रपूर जिल्ह्यात ‘सोन्याची खाण’ बनण्याची क्षमता आहे, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर वन अकादमी येथे आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर २०२४-इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री मुनगंटीवार होते. मंचावर आमदार किशोर जोरगेवार, विकास गुप्ता, बाळासाहेब दराडे, मधुसूदन रुंगटा, गिरीश कुमारवार, मित्तल ग्रुपचे आलोक मेहता, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, आयुक्त विपीन पालिवाल, के.जी. कुभाटा उपस्थित होते.

हेही वाचा…नागपूर : नरेंद्रनगर चौकात उड्डाण पुलाची लँडिंग धोक्याची, वाहतूक कोंडीने मनस्ताप

यावेळी मुनगंटीवार यांनी सामंजस्य करार करणाऱ्या १९ उद्योग कंपन्यांचे आभार मानले. जिल्ह्यात येणाऱ्या तसेच प्रगती, उन्नती व विकासासाठी तयार असलेल्या उद्योगांच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकार आहेच, सोबतच जिल्हा प्रशासन व स्वत: मीदेखी उभा राहील, असा विश्वास त्यांनी दिला. उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांसोबतच विमानतळ, रेल्वे व रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाहीही मुनगंटीवार यांनी दिली. वीज केंद्र व वेकोलिच्या कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे आता प्रदूषणावर ठोस काम करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

उद्घाटनपर भाषणात लोढा यांनी स्थानिक उद्योजकांना कानमंत्र देत, आयुष्यात जे काही करायचे आहे ते सर्वोत्तम करा, यशस्वी होण्यासाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नाही, त्यासाठी परिश्रम करावे लागतात, असे सांगितले. आमदार जोरगेवार यांनी, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी लाल गालिचे टाकून उद्योगांचे स्वागत करतात, मात्र उद्योग स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी प्रवेशद्वारावर ‘रेड क्रॉस’ करून ठेवतात. हा प्रकार बंद करून उद्योगांनी स्थानिकांना रोजगार द्यावा, स्थानिक एमआयडीसीतून साहित्य खरेदी करावे, असे आवाहन केले. एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांनी उद्योगांना स्वस्त दरात वीज द्यावी, अशी मागणी केली. यावेळी १९ उद्योगांचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारी गौडा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

हेही वाचा…नागपूर : सावधान! ब्युटीपार्लर-स्पाच्या नावावर ‘सेक्स रॅकेट सक्रिय

सुधीर मुनगंटीवार मौल्यवान ‘कोहिनूर हिरा’

मंगलप्रभात लोढा यांनी पालकमंत्री मुनगंटीवार हे मौल्यवान ‘कोहिनूर हिरा’ आहे. या हिऱ्यामध्ये चंद्रपूरला सोन्याची खाण बनवण्याची क्षमता आहे, अशा शब्दात स्तुतिसुमने उधळली. मुनगंटीवार माझे मुख्याध्यापक, शिक्षक व मॉनिटरदेखील आहेत, जे कोणाच्या मनात येत नाही ते मुनगंटीवार यांच्या मनात येते, असेही लोढा यांनी सांगितले.

कंपनीनिहाय गुंतवणूक

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ४० हजार कोटींची गुंतवणूक करून स्टील प्लांट उभारणार आहे.

लॉयड मेटल्स ६४०० कोटींची गुंतवणूक करणार.
अंबुजा सिमेंट २५०० कोटींची गुंतवणूक.

ग्रेटा ग्रुप १२५० कोटींची गुंतवणूक
अरबिंदो रिॲलिटी ६५५ कोटींची गुंतवणूक.

राजुरी स्टील ६०० कोटींची गुंतवणूक.
सन फ्लॅग ३१० कोटींची गुंतवणूक

इतर कंपन्यांकडून ५० ते १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advantage chandrapur 2024 mous worth 75721 crores signed with 19 companies rsj 74 psg
Show comments