जिल्हा न्यायालय परिसरात मृतदेह सापडला
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करणारे अॅड. श्रीकांत खंडाळकर (५०,रा. वनामती, धरमपेठ) यांचा सिव्हील लाईन्स परिसरातील जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारतीच्या ‘न्यायमंदिर’च्या मागे मृतदेह सापडल्याने वकील क्षेत्रात खळबळ उडाली. त्यांच्या कोटाच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले पत्र सापडले असून गंभीर आजारामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यात लिहिले आहे. ही घटना आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास न्यायमंदिराच्या सुरक्षेतील एका शिपायाकडून उघडकीस आली.
अॅड. खंडाळकर गेल्या वीस वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात वकिली करीत होते. जनहित याचिकेद्वारा त्यांनी शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे या क्षेत्रात त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले होते. काल, शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास तयारी करून कोर्टात जात असल्याचे पत्नी सुनंदा खंडाळकर यांना सांगून घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी कार, स्कूटर काहीच घेतले नव्हते. त्यामुळे ते कुणाच्या तरी सोबत कोर्टात गेले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काल, संध्याकाळी ५ वाजता सुनंदा यांचे शेवटचे त्यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाले होते, परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने सुनंदा यांनी पुन्हा त्यांचा मोबाईल क्रमांक लावला असता तो बंद येत होता. त्यामुळे त्यांनी सीताबर्डी पोलिसात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास न्यायमंदिराच्या सुरक्षेतील एक शिपाई इमारतीभोवती चक्कर टाकत असताना एक व्यक्ती मुख्य इमारतीमागे जमिनीवर पडलेली आहे. त्याच्या अंगात वकिलाचा पोशाख होता. त्याने आपल्या सहकाऱ्यांना माहिती देऊन सदर पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असता त्यांच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या आणि पॅन्ट सुटलेली होती. यासंदर्भात पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी, प्रथमदर्शनी न्यायमंदिराच्या पाचव्या आणि सातव्या माळ्यावर त्यांच्या जोडय़ाच्या खुणा दिसत असून या इमारतीवरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असावी, असे दिसत असल्याचे सांगितले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात हलविण्यात आला असून या अहवालानंतरच ही आत्महत्या आहे की खून, हे स्पष्ट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा