अमरावती : अचलपूर तालुक्यातील मौजा फरमानपूर येथील मृत वराहाच्या नमुन्यामध्ये प्राप्त अहवालात ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’चा प्रादुर्भाव आढळून आल्‍याने खळबळ उडाली आहे. रोगाचा प्रार्दुभाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मौजा फरमानपूर या भागाच्‍या एक किलोमीटर परिघातील क्षेत्रास बाधितक्षेत्र व दहा किलोमीटर परिघातील क्षेत्रास संनियंत्रण क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्‍हाधिकारी सौरभ कटियार यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करुन त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्‍याचे आदेश आहेत. या क्षेत्रात सक्रिय संनियंत्रण व्यापक प्रमाणात व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. वराहाच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनांची नोंदणी पूर्ण करून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. मोकाट पद्धतीने होणारे वराहपालन टाळावे. घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे हे विषाणूच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरते. ते टाळावे, तसेच निरोगी वराहाचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये. वराहपालन केंद्रातील तसेच मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. सर्व कचरा नष्ट करावा किंवा सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्तदृष्ट्या त्याची विल्हेवाट लावावी. वराहपालन करणारे पशुपालक व या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींमध्ये जागृती करावी. शेजारच्या राज्यातील वराहांचा अनधिकृत प्रवेश होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने पोलीस व तपासणी नाक्यांशी समन्वय ठेवावा, असे आदेशात नमूद आहे.

हेही वाचा – यवतमाळ : खळबळजनक! एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

हेही वाचा – तलाठी भरती पेपर फूटला हे निश्चित, नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे आरोपपत्रावरून सिद्ध

आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरातील सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मर्तुकीवर बारकाईने लक्ष ठेवावे. वराहाच्या मासाची विक्री करणाऱ्या आस्थापनाची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन त्या आस्थापनांना स्थानिक पशू वैद्यकीय यांनी नियमित भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. तसेच वराहपालन करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता व जैव सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: African swine fever in amravati district mma 73 ssb