चंद्रपूर: महाऔष्णिक विद्युत केंद्रच्या ५०० मेगावॉटच्या संच क्रमांक ८ मधून सलग २०० दिवस कार्यरत राहून वीज निर्मितीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. चंद्रपूर वीज केंद्रात १४ वर्षानंतर एखाद्या संचाने सलग २०० दिवस कार्यरत राहून वीज निर्मिती केली आहे. वीज केंद्रातील अभियंत्यांचे हे यश आहे.
महाऔष्णिक विद्युत केंद्र हे सद्यस्थितीत २९२० मेगावॉट स्थापीत क्षमता असलेले विदयुत निर्मिती केंद्र आहे. या विद्युत केंद्रामध्ये ५०० मेगावॉटचे ५ संच व २१० मेगावॉटचे २ संच कार्यान्वीत आहेत. महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वीज निर्मिती क्षेत्रात नेहमीच महत्वाची व उल्लेखनिय कामगिरी करत असते. या विद्युत केंद्रातील संच क्र. ८ ने अनेकदा नवीन विक्रम गाठलेले आहेत. त्यातच अजुन एक नविन भर घालत सातत्याने २०० दिवस वीज निर्मिती करण्याचा एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे.
हेही वाचा… महाराष्ट्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना काय? जाणून घ्या…
संच क्रमांक ८ ने १० मे २०२३ पासुन आज पर्यंत सातत्याने २०० दिवस अखंडपणे वीज निर्मिती करत नवीन विक्रम स्थापीत केलेला आहे. ५०० मेगावॉटचे संच क्र. ८ हे चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या च्या इतिहासात 200 दिवस सतत कार्यरत राहणारे दुसरे संच आहे. या आधी २००९ या वर्षी संच क्र. ३ ने सातत्याने २०० दिवस सतत वीज निर्मिती करण्याचा विक्रम स्थापीत केला होता आणि त्यानंतर तब्बल १४ वर्षानंतर हा टप्पा संच क्र. ८ ने गाठलेला आहे. चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांनी सर्वांचे अभिनंदन करताना संच क्र. ८ च्या चमुच्या मेहनतीमुळे व कार्याप्रती समर्पणामुळेच हा टप्पा गाठता आला असा उल्लेख केला.
हेही वाचा… बुलढाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांची हानी; शेडनेटचे मोठे नुकसान, ५२ घरांची पडझड
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, संजय मारुडकर संचालक (संचलन), डॉ. धनंजय सावळकर संचालक (खनिकर्म), बाळासाहेब थिटे संचालक (वित्त), अभय हरणे संचालक (प्रकल्प), पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (संवसू-२), डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) आणि राजेश पाटील कार्यकारी संचालक (संवसू-१) यांनी या प्रसंगी संच क्र. ८ मध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले. मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर वीज केंद्राने हा टप्पा गाठलेला असुन सातत्याने वीज निर्मिती क्षेत्रात अशीच यशस्वी वाटचाल करीत राहण्याचा निर्धार केलेला आहे.