नागपूर : शहरात जवळपास २२०० पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असून केंद्र सरकारच्या ४८ तासांच्या इशाऱ्यानंतर त्यांच्यात एकच खळबळ उडाली होती. काही पाकिस्तानी नागरिकांनी स्वत:च पोलिसांकडे धाव घेतली तर काहींच्या थेट घरी पोहचून पोलिसांनी पडताळणी करीत अर्ज भरुन घेतले. संवेदनशील आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी याबाबत गोपनियता पाळली आहे. मात्र, कारवाईला गती आली असून प्रत्येक ठाण्याचे गुप्तचर विभाग आणि पोलीस पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांत सर्वाधिक सिंध प्रांतातील आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. केंद्र सरकारने पाकिस्तान, अफगानिस्तान व बांग्लादेशमधील हिंदू नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा नवीन कायदा केला आहे. या कायद्यांतर्गतजिल्ह्यात आतापर्यंत ९२४ जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. व्हिसावर आलेले पाकिस्तानी नागरिक सर्वाधिक जरीपटका ठाण्याच्या हद्दीत राहतात. पोलिसांनी १८ पाकिस्तानी लोकांची ओळख पटविली असून त्या सर्वांकडून अर्ज भरून घेण्यात आले. भारत सरकारच्या आदेशानुसार आम्ही पाकिस्तानला परत जात असल्याचे अर्जात नमूद आहे. या अर्जात सखोल माहिती आहे. संपूर्ण माहिती भरलेले अर्ज विशेष शाखेत जमा करण्यात आले आहेत.

नागपुरात सर्व पाकिस्तानी नागरिकांची कागदपत्रे आणि व्हिसाची स्थिती तपासण्यासाठी शहर पोलीस चोवीस तास काम करीत आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी संबंधित भागांत पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.

४८ तासांचा अल्टीमेटम संपला

पहलगाममध्ये २८ पर्यटकांचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर संरक्षणविषयक केंद्रीय समितीच्या (सीसीएस) बैठकीत सार्क व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केल्याची घोषणा करुन त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, तो अल्टीमेटम संपला आहे. मात्र, अद्याप पाकिस्तांनी नागरिकांना परत पाठविण्याबाबत काही हालचाली दिसत नाहीत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन शहरात मेडिकल आणि व्यावसायिक व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्यासाठी माहिती गोळा करीत आहेत.

पोलिसांची गुप्तता

पाकिस्तानी नागरिकांबाबत नागपूर पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत. ४८ तासांची मुदत संपली. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेणार? याबाबत उत्सूकता होती. मात्र, पोलीस आयुक्त, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता.