नागपूर: जुलैच्या अखेरीस महाराष्ट्रातून गायब झालेला पाऊस ऑगस्ट महिन्यात परतणार, या आशेवरही आता पाणी फेरले आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत असताना महाराष्ट्रावर मात्र त्याची कृपादृष्टी नाहीच. केवळ श्रावणसरींवर दिलासा मानावा लागत आहे.
राज्यात पावसाच्या पुनरागमनाची तारीख पुन्हा एकदा लांबली आहे. हवामान विभागाने सध्या पावसासाठी पूरक वातावरण नसल्याचे स्पष्ट केले आहे. थोडक्यात ऑगस्ट महिन्यातही पाऊस अपेक्षाभंगच करताना दिसत आहे. तर, सप्टेंबरमध्ये मात्र, सात तारखेनंतर तो राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगला जोर धरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.