बुलढाणा : शासकीय कृषी महाविद्यालयापाठोपाठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्तावही मार्गी लागल्याने जिल्ह्याचा शैक्षणिक अनुशेष दूर झाल्याचे सुखद चित्र आहे. यामुळे जिल्ह्याचे नाव राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आले असून हजारो पालक-विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहाएक वर्षांपासून लालफितशाहित अडकलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाचा शासन निर्णय मागील १३ जुलैला निघाल्याने शासनाचे शिक्कामोर्तब झाले.

६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या या संस्थेत चालू शैक्षणिक (२०२३-२४) सत्रापासूनच प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गतच्या (डॉ. पंदेकृवि) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ३० हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ४५ शिक्षकवर्गीय तर ४३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना व १४६ कोटी ५४ लाख रुपये खर्चास मान्यता मिळाली आहे. यामुळे कृषी विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकोला, राहुरी वा राज्यात दूरवर जाण्याची गरज राहणार नाही.

‘मेडिकल’चा मार्गही मोकळा!

यापाठोपाठ प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्गही मोकळा झाला आहे. बुलढाण्यासाठी दहा किलोमीटर अंतरावरील हतेडी गावात २०.८० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येकी १०० विध्यार्थी व संलग्नित ४३० खाटाच्या रुग्णालयाला १६ जुलैच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुमारे २१ एकरची ई-क्लास जमीन वैद्यकीय शिक्षण विभागास नि:शुल्क उपलब्ध करून देतील. तसेच जिल्हा रुग्णालय व आवश्यकतेनुसार अन्य रुग्णालये स्थावर जंगम मालमत्तेसह ७ वर्षाकरीता वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यास मान्यता मिळाली आहे. एकाच महिन्यात जेमतेम तीन दिवसांच्या अंतराने उच्च शिक्षणाच्या सुविधा जिल्ह्यातच कार्यान्वित करण्याच्या घोषणांनी शैक्षणिक वर्तुळात जल्लोषाचे वातावरण आहे.