लोकसत्ता टीम

नागपूर : ‘एम्स’मधील कॉन्ट्रास्ट घोटाळा ‘लोकसत्ता’ने नुकताच पुढे आणला होता. त्यातच मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही दरिद्र्यरेषेखालील रुग्णांनाही ‘सीटी स्कॅन, एमआरआय’साठी आवश्यक ‘कॉन्ट्रास्ट’ बाहेरील औषधालयातून आणण्याची चिठ्ठी लिहून दिली जात आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात गरीब रुग्णांचा वाली कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एम्सनंतर मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांत या रुग्णांना बाहेरून ‘कॉन्ट्रास्ट’ आणायला लावले जात असल्याचे पुढे येत आहे. ‘कॉन्ट्रास्ट’चे इंजेक्शन ६०० रुपयांपासून २ हजार रुपये किमतीचे आहे. तर मेडिकलमध्ये सुमारे १ हजार २०० रुपयांचे ‘कॉन्ट्रास्ट’ रुग्णांकडून बोलावले जात असल्याचे नातेवाईक सांगतात. मेयो रुग्णालयातही आंतरुग्णांसाठी रुग्णालय प्रशासन ‘कॉन्ट्रास्ट’ची सोय करते. परंतु, बाह्यरुग्ण विभागातील गरिबांच्या हाती चिठ्ठी देऊन बाहेरून ते मागवले जात असल्याचे नातेवाईक सांगतात.

आणखी वाचा-नागपूर : गणेशपेठ बसस्थानक परिसरात ११ ट्रॅव्हल्सवर कारवाई

दरम्यान, मेडिकलमध्ये सध्या दिवसाला सुमारे १२५ रुग्णांचे सीटी स्कॅन आणि सुमारे १५ एमआरआय रोज काढले जातात. तर मेयो रुग्णालयात याहून निम्म्या रुग्णांच्या तपासण्या होतात. दरम्यान, नुकतेच कॉन्ट्रास्ट प्रकरणात एका कर्मचाऱ्याला एम्स प्रशासनाने बडतर्फ केले. परंतु, त्यात आणखी कोणी सहभागी आहे, याबाबत एकही अधिकारी सांगायला तयार नाही. त्यामुळे एम्सच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.

असे आहेत फायदे

‘एमआरआय’ आणि ‘सीटी स्कॅन’ तपासणीची प्रतिमा स्पष्ट येऊन रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान व्हावे म्हणून रुग्णांना तपासणीपूर्वी ‘कॉन्ट्रास्ट’चे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनमुळे औषध रुग्णाच्या रक्तवाहिनीत प्रवाहित होऊन तपासणीदरम्यान आजार कुठे व त्याचे प्रमाण किती हे डॉक्टरांना समजण्यास मदत होते.

मेडिकल, मेयो प्रशासनाने आरोप फेटाळले

मेडिकलमध्ये सर्वच रुग्णांना ‘कॉन्ट्रास्ट’ नि:शुल्क दिले जाते, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरज कुचेवार यांनी दिली. तर क्ष-किरणशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. आरती आनंद यांनी सध्या कॉन्ट्रास्ट नि:शुल्क नसून त्याची मागणी पाठवली आहे. ते उपलब्ध झाल्यास नि:शुल्क देणार असल्याचे सांगितले. मेयोच्या एका अधिकाऱ्याने बाह्यरुग्ण विभागातील काही रुग्णांना ते इंजेक्शन उपलब्ध नसल्यास बाहेरून घ्यावे लागत असल्याचे नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.