नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवाचा भाग बनावा म्हणून प्रशासन जनजागरण करत आहे. मात्र दुसरीकडे हिंदू संस्थांही यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. महायुतीच्यावतीने ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिल्यावर हिंदू संस्थांही मैदानात उतरत हिंदूना शंभर टक्के मतदानासाठी आवाहन करताना दिसत आहे.
नागपूरमध्ये यासाठी हिंदू संस्थांच्यावतीने ठिकठिकाणी ‘बॅनर्स’ लावण्यात आले आहेत तसेच घरोघरी पत्रके देखील वितरित केले जात आहेत. महायुतीच्यावतीने प्रचारादरम्यान बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है यासारख्या घोषणा दिल्या जात असल्यामुळे हिंदू संस्थांच्या शंभर टक्के मतदानाच्या आवाहनाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा…बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय माझा व फडणवीसांचा, गडकरी
काय आहे पत्रकात?
नागपूर शहरात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. हिंदू लोकजागरण मंचाच्यावतीने या सहाही विधानसभा मतदारसंघात पत्रके वितरित केले जात आहेत. मतदानाला जाऊ या, हिंदवी स्वराज्याची निर्मिती करू या अशा आशयाचे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे. मतदान करताना ‘बटेंगे तो कटेंगे..’ चा मंत्र लक्षात ठेवण्याचे आवाहनही यातून केले गेले आहे. समाजात दुफळी निर्माण माजवणारे, देवी-देवता-संत, महापुरुषांचा अपमान करणारे कोण? यांना ओळखून मतदानाला जाऊ तसेच लँड जिहाद, लव्ह जिहाद, धर्मांतरण, दगडफेक यावर अंकुश ठेवणारे सरकार निवडू या आणि मतदानाला जाऊ या असेही या पत्रकात सांगितले गेले आहे.
हेही वाचा…काँग्रेसने १९९२ च्या दंगल प्रकरणात कारवाई केली नाही – प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
भारतीय विचारधारा आणि अस्मितेला तिलांजली देणाऱ्या तसेच जागतिक स्तरावर भारताची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवूया असे आवाहनही पत्रकातून केले गेले आहे. याशिवाय हिंदू संस्थांनी ठिकठिकाणी बॅनर्स देखील लावण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील काशीनगर परिसरात अशाचप्रकारचे एक बॅनर लागले आहे. यात ‘महाकाली तू, तू ही मा भारती…’ अशा मथळ्याखाली शंभर टक्के मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे. ‘करे आतंकी का नाश, यही हमारी नीती’ याचा उल्लेख देखील यात करण्यात आला आहे. हिंदू संस्थांनी लावलेल्या बॅनर्स, पोस्टर्समध्ये कोणत्याही उमेदवाराचा किंवा पक्षाचा थेट प्रचार नाही, मात्र हिंदू बांधवाना आवाहन करणारा तसेच हिंदूविरोधी कृत्य करणाऱ्या पक्षांना धडा शिकविण्याचे अप्रत्यक्ष आवाहन यातून स्पष्टपणे करण्यात आले आहे. या पत्रकांचा मतदानावर किती परिणाम होतो आणि या आवाहनाचा कोणत्या पक्षाला फायदा होतो आणि कुणाला नुकसान हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.