नागपूर : शालेय शिक्षण घेताना सुरु झालेल्या प्रेमप्रकरणानंतर युवकाने प्रेयसीवर लग्नासाठी तगादा लावला.मात्र, बेरोजगार असलेल्या प्रियकराशी लग्न करण्यास प्रेयसी तयार नव्हती. त्यामुळे तिने प्रियकराला लग्नासाठी स्पष्ट नकार देऊन ‘ब्रेकअप’ केला. मात्र, तोच निर्णय प्रियकराच्या जिव्हारी लागला. त्याने दारुच्या नशेत प्रेयसीचे घर गाठले. तिला घराबाहेर बोलावले. मात्र, तिने नकार दिला.

त्याने दरवाज्याला लाथा मारुन दार उघडण्यास भाग पाडले. तिचे वडिल समोर येताच त्यांना बेदम मारहाण केली. वाद सोडवायला आलेल्या प्रेयशीसोबतही अश्लील चाळे करीत विनयभंग केला. ही घटना नंदनवनमध्ये घडली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन आरोपी प्रियकराला अटक केली. रुपेश कुमार (नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे.

नंदनवनमध्ये राहणारी २२ वर्षीय तरुणी प्रिती (काल्पनिक नाव) ही उच्चशिक्षित असून पूर्वी बंगळुरु येथे मोठ्या कंपनीत नोकरी करीत होती. गेल्या वर्षभरापूर्वी ती नागपुरात परत आली. तिचा शालेय जीवनातील मित्र रुपेश याच्याशी तिची मैत्री होती. दोघेही एकमेकांना नेहमी भेटत होते. यादरम्यान, रुपेश आणि प्रितीचे एकमेकांवर प्रेम जडले. तेव्हापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. पुढे ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली. तरीही दोघांत दुरावा आला नाही. रुपेश तिला भेटायला पुण्याला जात होता तर तीसुद्धी पुण्यातून आल्याबरोबर रुपेशसोबत फिरायला जात होती. सध्या तिने पुण्यातील नोकरी सोडली आणि ती मिहानमध्ये नोकरी करीत आहे. लाखभर पगार असलेल्या प्रितीला बेरोजगार पती नको होता. त्यामुळे ती रुपेशला नेहमी व्यवसाय किंवा नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देत होती. मात्र, यादरम्यान, रुपेशची मैत्री गुन्हेगारीत वावरणाऱ्यांशी झाली. त्याच्यावर काही गुन्हे दाखल झाले. त्यामुळे प्रितीने त्याच्याशी दुरावा करण्याचा प्रयत्न केला. तिने काही दिवसांपूर्वीच ‘ब्रेकअप’ करुन ती मोकळी झाली.

प्रेयसीच्या वडिलाला मारहाण

गेल्या ३ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता रुपेश हा प्रितीच्या घरी गेला. त्याने प्रितीला घराचे दार उघडण्यास सांगितले. मात्र, तिच्या वडिलाने नकार दिला. त्यामुळे रुपेशने दरवाज्याला लाथा मारुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भीतीने प्रितीचे वडिल बाहेर आले. रुपेशने त्यांना मारहाण केली. तसेच मुलीशोबत लग्न लावून न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली. यानंतर रुपेश तेथून निघून गेला. तरुणीने नंदनवन पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन रुपेशला अटक केली. रुपेश याच्यावर चार गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारित सक्रिय आहे. यापूर्वीसुद्धा लकडगंज आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. जातरोडीत तर प्रियकराने प्रेयसीच्या वडिलाचा चक्क भरचौकात खून करुन इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती, हे विशेष.