बुलढाणा : न्यायालयाच्या आदेशानुसार शेगाव येथील तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज बुधवारी, पाच मार्च रोजी संध्याकाळ अखेर कमीअधिक १९२ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

यापूर्वी काल चार मार्च रोजी प्रचंड पोलीस बंदोबस्तात बुलडोजरचा वापर करून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. मुरारका शाळेजवळील शीट क्रमांक १६, भूखंड २० येथे असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या जागेवर २००० पासून अनधिकृत वस्ती वाढली . अनेक वर्षांपासून प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचे प्रयत्न केले. मात्र स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई अडकली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणानी कठोर भूमिका घेतली . न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. स्वतः अतिक्रमण हटवावे, प्रशासन स्वतः अतिक्रमण काढेल, असा ईशारा देण्यात आला होता . यावेळी होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणधारकांचीच राहील, असे स्पष्ट करण्यात आले होते . ही कारवाई आज दुसऱ्या दिवशीही सुरु होती. परिसरात असलेला मलबा काढण्यात येत आहे.

पुनर्वसनाचे काय?

सन २००० पासून या जागेवर अनेक कुटुंबे राहत आहे . अनेक वर्षांपासून या कुटुंबांनी पुनर्वसनाची मागणी केली होती, मात्र कोणतीही ठोस योजना प्रशासनाकडून मांडली गेली नाही. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यानंतर येथील रहिवाशांचे पुनर्वसन कसे होणार किंबहुना होणार का? हा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक कुटुंबे बेघर झाल्याने सामाजिक संघटना आणि काही स्थानिक नेत्यांनी या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

शेगाव क्रीडा संकुलावरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने याआधीही अनेकदा मोहिमा आखल्या, मात्र स्थानिक राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे त्या मोहिमा अपयशी ठरल्या. मात्र आता न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासन पूर्ण तयारीनिशी उतरले असून,सलग दोन दिवस कारवाई करण्यात आली आहे.काही अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन आपले अतिक्रमण हटविले तर बहुतेक अतिक्रमणावर बुल्डोजर चालविण्यात आला आहे. यावेळी नगर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. तसेच तीनशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

Story img Loader