बुलढाणा: तब्बल तीस तासांच्या अस्वस्थ करणाऱ्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘निकाल’ लागला अन् धीरज लिंगाडे विजयी झाल्याच्या घोषणेनंतर त्यांच्या कर्मभूमी असलेल्या बुलढाणा शहरासह जिल्ह्यात विजयाचा एकच जल्लोष साजरा झाला. दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आल्याचा भास फटाक्यांच्या सार्वत्रिक आतीषबाजीने झाला! तिन्ही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांसह मुख्य चौक आणि रस्तेही गुलालाने माखल्याचे दिसून आले.

 गुरुवारी (दि. २) सकाळी आठला अमरावतीमध्ये सुरू झालेली  अमरावती पदवीधरची मतमोजणी बाद फेरीपर्यंत लांबली. यामुळे दूरवरच्या लाखो बुलढाणेकरांना सात-आठ नव्हे तब्बल तीस तास अधिकृत निकालाची प्रतीक्षा करावी लागली. मात्र विजयाची खात्री असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काल मध्यरात्रीच जयस्तंभ चौकात जल्लोष साजरा करून टाकला.

हेही वाचा >>> अमरावती पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी, भाजपाला धक्‍का

आज शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या आसपास धीरज लिंगाडे यांच्या विक्रमी विजयाची घोषणा झाली आणि मग जिल्ह्यात फटाकेबाजीला प्रारंभ झाला. बुलढाणा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. यावेळी तिन्ही पक्षांचे झेंडे उंच उंच फडकत होते. हा जल्लोष संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहीला.

Story img Loader