वर्धा: शासकीय कामांचा खाक्या नव्याने सांगण्याची गरज नाही. अर्धवट कामे टाकून दिल्याने नागरिकांना होणारा मनस्ताप नित्याचा. कारंजा घाडगे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला.
वाहतूक सुरू झाली. परंतु त्यावर पथदिवे लागण्याचा पत्ताच नव्हता. रस्त्यावर प्रकाश नाही व भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहने यामुळे नागरिक कोंडीत सापडले होते. धावडी, खैरी, भालेवडी येथील लोकांचे याच मार्गावरून येणे जाणे असते. अंधार राहत असल्याने बायाबापडे त्रस्त झाले होते.
हेही वाचा… नागपूर: कुख्यात गुन्हेगार शेख अफसरच्या घरातून ६ काडतूस जप्त
अखेर नागरी संघर्ष समितीने महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे निवेदने देणे सुरू केले. परंतु ते न ऐकल्याने दिवाळीपूर्वी पथदिवे सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. चक्रे गतीने फिरली. पथदिवे सुरू झाले. रस्ता प्रकाशमान झाल्याने दिलासा मिळाला असल्याची भावना संघर्ष समितीने व्यक्त केली आहे.