अमरावती: येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात भ्रमणध्वनीपाठोपाठ आता गांजाही आढळून आला आहे. भिंतीवरून चेंडूद्वारे गांजा व नागपुरी खर्रा पुरवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जनरल सुभेदाराच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कारागृहातील जनरल सुभेदार प्रल्हाद लक्ष्मण इंगळे (५५) हे गुरुवारी आतील बाजूस हायवे समांतर तटाच्या भिंतीलगत टॉवर क्रमांक २ ते ३ क्रमांक दरम्यान संचारफेरी करीत होते. त्यावेळी त्यांना एक निळ्या रंगाचा चेंडू दिसून आला. त्यांनी त्या चेंडूचे निरीक्षण केले. त्यावेळी त्या चेंडूत त्यांना १९ ग्रॅम गांजा आणि दोन नागपुरी खर्ऱ्याच्या पुड्या आढळल्या. हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने याबाबतची माहिती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना दिली. त्यानंतर कीर्ती चिंतामणी यांच्या आदेशानुसार त्यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा… कंत्राटी नोकर भरती प्रकरणावरून विरोधी पक्षनेत्यांची टीका, “पापावर पांघरूण घालण्यासाठी…”
तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत गांजा व खर्रा पुड्या जप्त केल्या. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कारागृहातील दोन कैद्यांजवळ बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनी आढळून आला होता. या प्रकरणात दोन्ही कैद्यांविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाईल कुठून आला, याचा तपास पोलीस करीत असतानाच आता गांजा आढळून आला. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.