वाशीम : अकोला-नांदेड राज्य महामार्ग शहरातील मध्यभागातून जातो. याच मार्गावर शहरातील वाहने आणि जड वाहनांची रेलचेल असल्याने वाहतुकीची कोंडी होते. या मार्गावर अनेक अपघातही घडले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २५ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील एका जाहीर कार्यक्रमात वाशीम शहरातून जाणाऱ्या अकोला नाका ते हिंगोली नाका हा १२ किलोमीटरचा रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनधींमध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे. कुणाच्या प्रयत्नातून रस्ता मंजूर झाला यावरून जिल्हावासीयांमध्ये संभ्रम आहे.
अकोला जिल्ह्यातून वाशीम जिल्हा उदयास आल्यानंतर शहराचा विस्तार झपाट्याने झाला. पर्यायाने वाहनांची संख्याही वाढली. शहराच्या मध्य भागातून जाणारा राज्य महामार्ग शहरातील वाहतूक व अकोला नांदेड या रस्त्यावर चाललेली जड वाहतूक, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध रुग्णालये, पोस्ट ऑफिस, बँका, बस स्थानक, पोलीस ठाणे व इतर शासकीय कार्यालये जवळ असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज होती.
हेही वाचा – सतत ज्ञानज्योत पेटविणारे ज्ञानदीप डॉ. प्रा. रघुनाथदादा कडवे यांची प्राणज्योत मालवली
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रयत्न केल्याचे यापूर्वी ऐकिवात नसताना हिंगोली येथील एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अकोला नाका ते हिंगोली नाका या १२ किलोमीटर अंतरावरील रस्त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हा संपूर्ण रस्ता ‘स्ट्रीट लाईट’सह चार पदरी करण्याची घोषणा करताच जिल्ह्यातील खासदार भावना गवळी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी हा रस्ता आमच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचे सांगितले. तसे वृतही काही दैनिकातून प्रकाशित झाले असून समाज माध्यमांवरदेखील तसे संदेश प्रसारित होत आहेत, तर भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर कार्यक्रमात पत्र दिल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित झाल आहे. हा रस्ता भाजपाचे आमदार लखन मलिक यांच्या मतदारसंघातील असून त्यांनी मात्र, याबाबत कुठलाही दावा केलेला नाही.