लोकसत्ता टीम
नागपूर : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर चांगलीच अडचणीत आली आहे. विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई सुरु केली. यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तुमची आयएएसची निवड का रद्द करू नये? अशी नोटीस पाठवली आहे.
राज्य शासनाने चौकशी सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहे. दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे. वडिलांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. यामुळे पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
आणखी वाचा-दोन कुख्यात गँगस्टरला अटक, राजुरा गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी…
त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. खेडकर प्रकरणानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी अधिक कठोर होण्याची शक्यता आहे.
दिव्यांग उमेदवारांची तपासणी मुंबईला
तसेच राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. आयोगाकडून उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबतच्या सूचना व कार्यपध्दती तसेच वैद्यकीय तपासणीचा दिनांक व ठिकाण उमेदवारांना स्वतंत्ररित्या त्यांच्या प्रोफाईलद्वारे कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
आणखी वाचा-चंद्रपूर : दबा धरून बसलेल्या वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला
रुग्णालयांची जबाबदारी काय?
अर्जदार अपंगत्व प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात आल्यानंतर तेथील कर्मचारी कागदपत्रांची पडताळणी करतात. अर्जदाराची मूळ कागदपत्रे आणि संकेतस्थळावरील कागदपत्रे तपासली जातात. याचबरोबर अर्जदार आणि त्याचे संकेतस्थळावरील छायाचित्र तपासून तो एकच व्यक्ती असल्याची खातरजमा केली जाते. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराला शारीरिक तपासणीसाठी एक तारीख दिली जाते.
पूजा खेडकर प्रकरणी काय घडले?
पूजा खेडकर यांनी नगरमधील जिल्हा रुग्णालयातून दोन वेळा अपंगत्व प्रमाणपत्र घेतले. पहिले प्रमाणपत्र त्यांनी २०१८ मध्ये दृष्टी अधू असल्याचे घेतले. त्यानंतर तेथूनच त्यांनी २०२० मध्ये मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र घेतले. यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाकडून अस्थिव्यंगाचे प्रमाणपत्र मिळविले. मात्र, त्यात त्यांना केवळ ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे दाखविण्यात आले. त्याच वेळी त्यांनी औंधमधील जिल्हा रुग्णालयातही प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे समोर आले. अस्थिव्यंगासाठी वायसीएम रुग्णालयाने आधीच प्रमाणपत्र दिले असल्याने औंध रुग्णालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.