नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) ही एक राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आहे. ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली संघटना आहे. तीस लाख वीस हजारांहून जास्त सदस्य असलेली ही जगातील मोठी विद्यार्थी संघटना आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विद्यार्थी हितासाठी काम करणारी संघटना आहे. भाजपमध्ये असलेले अनेक मोठे पदाधिकारी हे अभाविपमधून आले आहेत. त्यामुळे अभाविपच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणुकीच्या काळात मोठी जबदारी असते. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संघटनेने अधिक सक्रिय व्हावे यासाठी अचानक अभाविपच्या कार्यकारिणीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

भाजपच्या सुक्ष्म नियोजनाचा भाग

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने समाजातील प्रत्येक मतदारावर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अभाविपच्या कार्यकारिणीमध्ये होणारा हा बदलही याचाच एक भाग असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महानगर २०२४-२५ ची कार्यकारणी चिटणवीस सेंटर येथे घोषित करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये नवीन सदस्यांची निवड करण्यात आली असून महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अभय मुदगल यांची निवड करण्यात आली आहे. ते वी.एम.वी. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य आहेत. तर नागपूर महानगर मंत्री म्हणून दुर्गा सुधाकर भोयर यांची निवड करण्यात आली आहे.

हे ही वाचा…पक्षात घुसमट; रवी राणांच्‍या ‘या’ विश्‍वासू सहकाऱ्याने सोडली साथ…

निवडणुकीत खोट्या प्रचारावर उत्तर देण्याचे आवाहन

नवनिर्वाचित महानगर अध्यक्ष डॉ. मुदगल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना की, नागपुरात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश, परीक्षा व परिणामात कुठलीही समस्या येऊ नये यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या नेतृत्वाला योग्य दिशा देणे, त्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध आहोत असेही त्यांनी सांगितले. दुर्गा भोयर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि नूतन कार्यकारणीला मार्गदर्शन करत पुढील नियोजनाची माहिती दिली. यावेळी कार्यकर्त्यांना विरोधकांच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्याचे आवाहन करण्यात आले.

हे ही वाचा…प्राध्यापक भरतीसंदर्भात मोठी बातमी! नवीन धोरण काय…

निवडणुकीदरम्यान ५० हजार विद्यार्थ्यांचे लक्ष

अभाविपच्या वतीने जनजाती गौरव यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा गडचिरोलीपासून चंद्रपूर आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यात जाणार आहे. ज्यामध्ये २२ तालुके, एकूण ५६ महाविद्यालय, ४४ वसतिगृह, १० आश्रम शाळेत ही यात्रा जाणार आणि या यात्रेच्या माध्यमातून ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष विद्यार्थी परिषदेने घेतले आहे. ही यात्रा एकूण १३०० किलोमीटरची होणार आहे. ०७ ऑक्टोबर ला यात्रेची सुरुवात गडचिरोली येथे झाली असून या यात्रेचा समारोप चंद्रपूर येथे होणार आहे.