नागपूर : ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची आठवण करून देणारा भव्य दिव्य दीक्षाभूमी स्मारक स्तुप देश विदेशात आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. मात्र हा स्तुप साकारताना अनेक लोकांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला. १९५६ सालापासूनच तत्कालीन अंबाझरी मैदानावर स्मारकासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. ४५ वर्षाच्या संघर्षानंतर धम्मदीक्षा सोहळ्याच्या जागेवर भव्यदिव्य दीक्षाभूमी स्तुप साकारण्यात यश आले.

आधी होती गुरे चरण्याची जागा

धम्मदीक्षेपूर्वी वॅक्सिन इंस्टिट्युटकडे ही जागा होती. गुरांच्या चरण्यासाठी संस्थेने ही जागा राखीव ठेवली होती. २८ सप्टेंबरला ही जागा मिळविण्यासाठी रीतसर अर्ज करण्यात आला. १५ ऑक्टोबर पर्यंत धम्मदीक्षा सोहळ्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली. धम्मदीक्षा सोहळा पार पडल्यावर या जागेवर भव्य स्मारकासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. १३ एप्रिल १९५७ च्या मध्यरात्री बाबू हरिदास आवळे यांच्या नेतृत्वात मैदानावर बुद्धस्तंभ उभारण्यात आला. पाचपावलीच्या भीमराव गजघाटे यांनी ती बुद्धमूर्ती साकारली होती. अवैधरित्या बुद्धमूर्तीची स्थापना केल्याचे सांगून नागपूरच्या नझूल तहसीलदाराने न्यायालयात खटला देखील केला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दादासाहेब गायकवाड यांनी दीक्षाभूमीची आणि चैत्यभूमीची जागा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. १५ ऑगस्ट १९६१ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्मारक समितीला १४ एकर जागा हस्तांतरित केली. ३० सप्टेंबर १९६१ ला स्मारक समितीच्या कार्यालयाचे शिलान्यास करण्यात आले. १३ जुनला दादासाहेब गायकवाड यांची स्मारक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारकाच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली. दीक्षाभूमी स्मारकासाठी संघर्ष त्यानंतरही सुरूच राहीला.

हे ही वाचा…संघ शंभरीत पण प्रार्थनेचे वयोमान ८४….असे का माहितेय…?

एडिरेसिंगेंच्या हस्ते झाले भूमिपूजन

सध्या जी दीक्षाभूमी आपल्याला बघायला मिळत आहे त्याचे भूमिपूजन जागतिक बौद्ध परिषदेचे अध्यक्ष भदंत आलबर्ट एडिरेसिंगे ( श्रीलंका) यांच्या हस्ते २७ जून १९७८ ला झाले. स्तुप साकारण्यासाठी तीन कोटींचा बजेट तयार केला गेला. १२० फुटांच्या स्तुपाचे शिल्पकार शिवदानमल मोखा आहेत. सांची स्तुपाच्या आधारे दीक्षाभूमी स्तुप साकारण्यात आले आहे. २००१ साली तत्कालीन राष्ट्रपती के.आर.नारायण यांच्या हस्ते दीक्षाभूमी स्तुपाचे उद्घाटन केले गेले. दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या दीक्षाभूमीचा पुनर्विकास आराखडा तयार केला आहे. आराखडयानुसार दीक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करण्याचा दावा राज्य शासन करत आहे. त्यामुळे येत्या काळात दीक्षाभूमी परिसर आणखी भव्य स्वरुपात बघायला मिळण्याची शक्यता आहे.